परप्रांतीय खाजगी सावकारांचा पाचोरा तालुक्यात धुमाकूळ, अवास्तव व्याज घेऊन गरजूंची आर्थिक लुट.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०८/२०२३
बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने दमदार पावले टाकली असून बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. हा कायदा अमलात आणल्यानंतर आतातरी राज्यातील बेकायदेशीर अवैध सावकारीला निश्चितपणे लगाम बसेल असे गृहीत धरण्यात आले होते.
परंतु आजही सगळीकडे खाजगी सावकारांचा गोरखधंदा होता तसाच सुरु असल्याचे दिसून येत आहे. हे खाजगी सावकार गरजुंपर्यंत जाऊन त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत दरमहा, दर शेकडा कमीतकमी ३% व पैसा घेणाराची गरज पाहून जास्तीतजास्त १०% पर्यंतच्या व्याज दराने पैसे व्याजाने देऊन जर का दिलेल्या पैशाचे दरमहा व्याज न मिळाल्यास व्याजावर, व्याज आकारणी करुन मोगलाई पद्धतीने दिलेले पैसे व व्याजाची रक्कम वसूल करत आहेत. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात या खाजगी सावकारी व्यवसायात आता परप्रांतीयांनी उडी घेतली असून हे परप्रांतीय खाजगी सावकार गाव, खेड्यात जाऊन त्या गावातील एखाद्या व्यक्तीला हाताशी धरुन त्याच्या माध्यमातून गरजू लोकांना शोधून काढत त्यांना गरजेनुसार पैसे देऊन सावकारीचा गोरखधंदा राजरोसपणे करत आहेत.
कुठल्याही प्रकारची कागदपत्रे किंवा कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण न करता सरळसरळ हातात पैसा मिळत असल्याने बरेचसे लोक या खाजगी सावकाराकडून पैसा घेत असल्याचे दिसून येते. परंतु हा पैसा घेतल्यानंतर व्याज जास्त प्रमाणात असल्याने घेतलेल्या पैशाची परतफेड वेळेवर होत नसल्याने ही परतफेड करण्यासाठी घरातील किमती वस्तू, महिलांच्या अंगावरील दागिने मोडून या कर्जाची परतफेड करत आहेत. यामुळे महिलावर्ग कमालीचा त्रस्त झाला असून घराघरात भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता निर्माण झाली आहे.
म्हणून अशा या परप्रांतीय खाजगी सावकारांचा बंदोबस्त कसा करता येईल याकरिता त्रस्त महिलांनी आता हे खाजगी सावकार दिसतील तेथे झोडुन काढण्यासाठी कंबर कसली आहे. कारण या खाजगी सावकाराकडून पैसा घेऊन बरेचसे कुटुंबप्रमुख हे सट्टा, पत्ता, जुगार व दारुच्या व्यसनात हा पैसा वाया घालत असतात व महिलांनी याबाबत जाब विचारला तर मारठोक करतात व यांची तक्रार कुणाकडे करायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगत या खाजगी सावकारांचा त्वरित बंदोबस्त न झाल्यास आता आम्हीच आमच्या पध्दतीने या अवैध सावकारांचा बंदोबस्त करु व याकरिता आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल असे मत व्यक्त केले.