पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, भोजे व शिंदाड येथील पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०८/२०२३
पाचोरा तालुक्यातील गावागावात व विविध ठिकाणी बोगस पॅथॉलॉजी लॅबद्वारे रक्त चाचण्यांच्या माध्यमातून रुग्णांची फसवणूक व लूट केली जात असल्याच्या घटना वेळोवेळी हे उघड होत आहेत. या बोगस पॅथॉलॉजी लॅबची चौकशी होऊन कारवाई केली जात नसल्याने बोगस पॅथॉलॉजी लॅबची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बोगस पॅथॉलॉजी लॅब प्रशिक्षित मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्ट नसतांना देखील आरोग्य चाचणी अहवाल दिले जात असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत काही सुज्ञ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही मान्यता नसतांना या पॅथॉलॉजी लॅबमध्ये सर्रासपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे पुरावे सांगत पॅथॉलॉजी लॅबमध्ये सर्वच नियमांची पायमल्ली केली जात असून रक्त नमुने तपासणीसाठी घेतांना व रक्ताच्या चाचण्या करतांना नियमानुसार हॅन्ड ग्लोज, तोंडावर मास्क लावणे, (ड्रेस कोड) पॅथॉलॉजीस्टचे कपडे परिधान करणे गरजेचे असल्यावर ही हे सगळे नियम पायदळी तुडवले जात आहेत. विशेष म्हणजे पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्ताचे नमुने घेणारी व्यक्ती ही कोण आहे ? त्या व्यक्तीकडे लॅबमध्ये चाचण्या करण्यासाठीची शैक्षणिक पात्रता नसतांना तसेच राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत शासकीय महाराष्ट्र पॅरामेडिकल (परावैद्यक कौन्सिलकडे) नोंद केलीली नसतांना पॅथॉलॉजीक लॅबोरेटरीज फलक लावून आपल्या लॅब बिनधास्तपणे चालवत आहेत.
अशा बोगस पॅथॉलॉजीक लॅबोरेटरीज जळगाव जिल्ह्यात तसेच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे तीन, भोजे एक व शिंदाड येथे एक बिनधास्तपणे सुरु असून या बोगस पॅथॉलॉजीक लॅबोरेटरीज मुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण या लॅबोरेटरीज मधुन रक्त, लघवी, थुंकी तपासणीसाठी आल्यानंतर या बोगस लॅबोरेटरीज मधुन जो अहवाल (रिपोर्ट) दिला जातोय हा अहवाल पाहूनच डॉक्टर काय उपचार करायचे ते ठरवतात मग जर या अप्रशिक्षित लॅबोरेटरीज मधुन चुकीचे निदान होऊन चुकीचे अहवाल (रिपोर्ट) डॉक्टरांच्या हातात गेल्यावर नक्कीच चुकीचे उपचार केले जात असतील तर रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे हे सगळ्यांनाच मान्य करावे लागेल हे तेवढेच खरे.
*महत्वाचे*
विशेष म्हणजे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील तीन, शिंदाड येथील एक व भोजे येथील एक लॅबोरेटरीज ह्या बोगस पॅथॉलॉजीक लॅबोरेटरीज असल्याचे माहीत असतांनाही मान्यताप्राप्त डॉक्टर त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना या लॅबोरेटरीज मध्ये पाठवतातच कसे व यांनी दिलेला अहवाल (रिपोर्ट) हा योग्य आहे असे समजून रुग्णांवर उपचार करतातच कसे हा कळीचा मुद्दा समोर येत असून संबंधित लॅबोरेटरीज चालक व संबंधित डॉक्टरांचे अर्थपूर्ण लागेबांधे आहेत की काय ? अशी शंका जनमानसातून व्यक्त केली जात असून आता तालुका वैद्यकीय अधिकारी या बोगस पॅथॉलॉजीक लॅबोरेटरीज वर कधी व काय कारवाई करणार आहेत याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
अशाच बोगस पॅथॉलॉजीक लॅबोरेटरीज पाचोरा तालुक्यातील गावागावात सुरु आहेत. याबाबत लवकरच सविस्तर माहिती घेऊन याचा पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच या बोगस पॅथॉलॉजीक लॅबोरेटरीज बद्दल कायदे व नियम याबाबत सविस्तर माहिती लिहायची झाल्यास खुपच काही आहे. परंतु तुर्तास एवढेच.