कपाळ करंट्या शेतकऱ्यांच्या पोरा, वेळीच जर रस्त्यावर उतरला असता, तर तुझा बाप असा नाडला गेला नसता. संतोष पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०२/२०२३

*कपाळ करंट्या शेतकऱ्यांच्या पोरा*
*वेळीच जर रस्त्यावर उतरला असता*
*तर तुझा बाप असा नाडला गेला नसता*
संतोष पाटील
————————————————————
स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आजपर्यंत शेतीमध्ये फार मोठे स्थित्यंतरे आलीत मात्र शेती फायद्याची व उत्तम अशी कधीच झाली नाही, या सर्व गोष्टींना कारणीभूत शेतकरी विरोधी कायदे ध्येय धोरण हेच आहेत, हे कायदे स्वातंत्र्यपूर्व काळात ही होते आणि आजही आहेत, घटनेमध्ये बिघाड करून पारतंत्र्यातले २८४ पैकी २५० कायदे जसेच्या तसे ठेवून परिशिष्ट ९(३१ बी) मध्ये टाकण्यात आले, १९५५ साली सर्वात घातक असा जीवघेणा कायदा म्हणजे “आवश्यक वस्तूंचा कायदा” तयार करण्यात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत या कायद्याचा आधार घेत शेतात पिकणाऱ्या सर्व मालांचे भाव पाडण्यात आले.

पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याचा विचार केला गेला मात्र या विरोधात ना कोणी विरोधातला बोलला ना सत्तेतला, गेले कित्येक वर्ष हा अन्याय अत्याचार शेतकरी सहन करत राहिला, शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या कृषी निविष्ठा व त्यांचे भाव गगनाला भिडले आणि शेती पिकाचे भाव माती मोल झाले. तरीही कोणी मायेचा लाल शेतकऱ्यांसाठी उभा राहिला नाही, मात्र या सर्व पुढाऱ्यांसाठी नेत्यांसाठी ही कपाळ करंटी शेतकऱ्यांची पोरं वेळोवेळी उभी राहिली. पुढे आली यांना निवडून आण्यासाठी यांच्या संरक्षणासाठी स्वतःचा जीव द्यायला लागली मात्र आपल्या शेतकरी बापाच्या प्रश्नांसाठी यांनी कधीच आपल्या नेत्यांना पुढाऱ्यांना पक्षांना प्रति प्रश्न केला नाही.

बापाला का लुठला जातोय असे विचारण्याचे धाडस यांच्यात झाले नाही, बापाच्या मारेकऱ्यांचे झेंडे खांद्यावर मिरवणाऱ्या अवलादि शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आल्या म्हणून आज रोजी सर्व कृषक समाजाची ही अवस्था निर्माण झाली, बापाचा सातबारा यांना माहित नाही. सातबाराचा गट क्रमांक त्यांना माहीत नाही मात्र नेत्याचा संपूर्ण बायोडाटा यांचा तोंडपाठ आहे, आता उध्वस्त झालेला शेतकरी बाप कष्ट करून पिकत नाही, पिकलं तर विकत नाही, आणि विकलं तर हातात काहीच पडत नाही. असं म्हणून आत्महत्या करत आहे, आणि ही कपाळ करंटे पोरं आमचा नेता पावरफुल म्हणून गावभर बोंबलत फिरत आहेत, अरे शेतकऱ्यांच्या पोरांनो जरा लाजा धरा तुम्ही काय करताय तुम्हाला कळत नाही, बाप फाशी घेतोय आणि तुम्ही त्याला दोर आणून देत आहे. तुम्ही बापाच्या मारेकऱ्यांच्या कळपात सामील झालेले गद्दार आहात, तुम्हीच खरे बापाचे मारेकरी आहात हे आता सिद्ध होताना दिसत आहे…..

संतोष पाटील
७६६६४४७११२