बहुलखेडा गावात मुन्नाभाई एम. बी. बी. एस. करतोय रुग्णांच्या जिवाशी खेळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०७/२०२३
सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा या छोट्याशा गावात ग्रामीण भागातील जनतेच्या अशिक्षित पणाचा व माणूसकीचा फायदा घेत मागील काही वर्षांपासून एक बोगस डॉक्टरने एका पत्र्याच्या शेडमध्ये आपला दवाखाना मोठ्या दिमाखात थाटला असून बिनधास्तपणे औषधांचा वापर करुन आपण खुप शिकलेलो आहोत अशी शेखी मिरवत दवाखान्यासमोर कोणताही बोर्ड न लावता आपण खुप मोठे डॉक्टर आहोत अश्या पध्दतीने थोडक्यात सांगायचे झाले तर (मुन्नाभाई एम. बी. बी. एस. ४२०) अश्या फार्मात दवाखाना चालवत असून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे सुज्ञ व जानकार लोकांमधून चर्चीले जात आहे.
या चर्चेनुसार आम्ही थेट सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा या गावाला भेट देऊन दवाखाना ज्या पत्र्याच्या शेडमध्ये आहे तेथे जाऊन पाहिले असता दवाखान्याच्या बाजूला एक मान्यताप्राप्त औषधालय (मेडीकल) असून बाजूलाच दुसऱ्या गाळ्यामध्ये या मुन्नाभाई एम. बी. बी. एस. यांनी आपला दवाखाना थाटला आहे. मात्र ज्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने दवाखाना थाटला आहे तेथे दवाखान्यासमोर कोणताही फलक लावण्यात आलेला नसल्याचे दिसून आले. यामुळे संबंधित डॉक्टरांनी होमिओपॅथी, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी किंवा कोणते शिक्षण घेतले आहे समजून येत नाही असे असले तरी संबंधित मुन्नाभाई एम. बी. बी. एस. याने त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये रुग्णांसाठी तीन पलंग व स्वतासाठी टेबल, खुर्ची तसेच रुग्णांना बसण्याची व्यवस्था केली आहे.
हे मुन्नाभाई एवढ्यावरच थांबले नसून ते बिनधास्तपणे ॲलोपॅथी औषधांचा वापर करत असून साधी, साधी लक्षणे जाणवली तरी रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी नको ते वर्णन करुन गरज नसतांना इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, हकनाक रक्त, लघवी, थुंकी तपासणी करायला लावून संबंधित लॅबोरेटरी संचालकांकडून कमीशन लाटणे तसेच वारेमाप औषधे लिहून देत औषधी विक्रेत्यांकडून कमीशन लाटणे असे प्रकार सर्रासपणे करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
संबंधित डॉक्टर हा बोगस डॉक्टर असल्याचे बहुलखेडा गावातील सुज्ञ नागरिकांनी सांगत या बोगस डॉक्टरचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा या बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एखाद्या रुग्णांच्या जीवावर बेतू शकते अशी भिती सत्यजित न्यूज कडे बोलुन व्यक्त केली आहे. याची दखल घेऊन सत्यजित न्यूज लवकरच सोयगाव तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून लवकरच खुलासा घेणार असून संबंधित डॉक्टर बोगस असल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी भाग पाडणार आहे.
छायाचित्रामध्ये दवाखाना असलेली पत्र्याची खोली व संबंधित डॉक्टरचे नाव, गाव, कोणते शिक्षण (डिग्री) घेतले आहे अशी कोणतीही माहिती नसलेले प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) दिसत आहे.