ठेकेदाराची दादागिरी, भररस्त्यात खोदली चारी. पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाची संशयास्पद भुमिका.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०७/२०२३
राज्य सरकारमध्ये आपापले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच चाललेली आहे. कोण कोणत्या पक्षाचा, कोण कोणत्या पदावर ही परिस्थिती पाहिली तर नक्कीच लहानपणी आम्ही संगीत खुर्ची हा खेळ खेळत होता. याची आठवण झाली व असाच खेळ आज महाराष्ट्रात खेळला जात असल्याने शासनच ठिकाणावर नसल्याने प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुणाचीही कसलीही भिती राहीली नसल्याने ते मनमानी पद्धतीने वागत असल्याने सर्वसामान्य जनतेला अनेक अडीअडचणी व समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मग यात पाचोरा तालुक्यात सगळीकडे सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी मस्तावले आहेत. असाच काहीसा प्रकार पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दिसून येत असून याचाच एक इरसाल नमुना म्हणजे बिल्धी धरणावरुन एका गावासाठी पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईन टाकण्यासाठीचे काम सुरु आहे. म्हणून बिल्धी धरण ते वरखेडी दरम्यान नवीन पाईप लाईन टाकतांना संबंधित ठेकेदाराने कमी लांबित, कमी वेळात व कमी खर्चात काम करुन घेण्यासाठी पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्यात बदल करुन पाईपलाईन टाकण्यासाठी चक्क वरखेडी ते बिल्धी धरणापर्यंत चारीचे खोदकाम सुरु केले असल्याचे दिसून येत आहे.
ही पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात येणारी चारी थेट जामनेर ते पाचोरा या महामार्गावरील वरखेडी ते लोहारी दरम्यान थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतच नव्हे तर थेट डांबरीकरणाला लागुन म्हणजे साईड पट्टीवर खोदण्यात येत आहे. हे खोदकाम करुन या खोदलेल्या चारीमध्ये लगेचच पाईप टाकून ती बुजवली जात नसल्याने या ठिकाणी खोदलेल्या चारीमध्ये शेतातुन येणारी गुरेढोरे पडत आहेत. तसेच रहदारीला अडथळा निर्माण झाला असून दिवसा, रात्रीच्या वेळी अंधारात अनेक दुचाकीवरुन जाणारांचे अपघात झाले आहेत व होत आहेत.
तसेच या पाईपलाईन करीता खोदण्यात आलेल्या चारीमध्ये पाईप टाकल्यानंतर ती चारी चांगल्याप्रकारे बुजवून देणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून अशी कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे चिखल व खड्डे तयार झाले असल्याने पायी चालणारे वाटसरु, गुरेढोरे व वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
“सार्वजनिक बांधकाम विभागाची संशयास्पद भूमिका”
————————————————————-
महामार्ग क्रमांक १९ वर पाचोरा ते अंबे वडगाव दरम्यानची हद्द
पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत परंतु आजची परिस्थिती व कामकाज पाहिल्यावर पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग अस्तित्वात आहे किंवा नाही हा प्रश्न सहाजिकच उपस्थित होतो. कारण पाचोरा ते अंबे वडगाव दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत वरखेडी ते लोहारी दरम्यान खोदण्यात आलेली चारी वाहनधारक, गुरेढोरे व सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असल्याने येत्या आठवड्यात वरखेडी व लोहारी गावातील ग्रामस्थ पाचोरा सार्वजनिक बांधकामला जाब विचारण्यासाठी जाणार असून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.