गर्भलिंगनिदान चाचणी करुन घेण्यासाठी, महाराष्ट्रातील महीला गुजरात राज्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०८/२०२२
सद्यस्थितीत लहान कुटुंब, सुखी कुटुंब. हम दो, हमारे दो अश्या पध्दतीने सुखी रहाण्यासाठी व लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासन तसेच आपण सगळेच प्रयत्नशील आहोत. परंतु हे प्रयत्न करतांना एक मुलगा व एक मुलगी असली पाहिजे किंवा मुलगी नकोच अश्या मनस्थितीत जवळपास नव्वद टक्के लोक आढळून येतात. व याच अट्टाहासाने आपण सुरवातीपासूनच पहिला मुलगाच पाहिजे म्हणून प्रयत्नशील असतो.
मग ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण पाहीजे ते पर्याय शोधून आपण चार पुस्तके शिकलो, सवरलो आहोत हे विसरुन नको ते प्रयत्न करुन फक्त आणि फक्त मुलगाच पाहिजे हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी गर्भलिंगनिदान चाचणी करुन घेण्यासाठी वाटेल ते करायच्या तयारीत पाहिजे तेवढा खर्च करुन गर्भलिंगनिदान चाचणी करुन घेतल्यावर जर का गर्भ स्री जातीचा म्हणजे मुलीचा असल्याचे समजले तर मुलगी नकोच म्हणून गर्भ सदोष असल्याचे कारण पुढे करून लगेचच गर्भपात करून मोकळे होतो. व यात कमी वेळात जास्त पैसा कमावण्यासाठी डॉक्टर ही सामील होऊन आपले भले करुन घेण्यासाठी सामील होतात.
असेच समाजातील स्वताला प्रतिष्ठित समजून घेणारे काही लोक आजही गर्भलिंगनिदान चाचणी करुन घेण्यासाठी गुजरात राज्यात जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता महाराष्ट्रातील काही मोठ्या शहरातून तसेच ग्रामीण भागातून ज्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी काडीमात्र संबंध नाही असे काही दलाल व ज्यांचे दवाखाने चालत नाहीत असे मान्यताप्राप्त डॉक्टर कमी वेळात जास्त पैसा कमावण्यासाठी या व्यवसायात उतरले असून हे दलाल गावागावातील काही महिलांना हाताशी धरून गर्भलिंगनिदान चाचणी करुन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांच्या शोध घेऊन त्यांना गुजरात राज्यात नेऊन पुढील सोपस्कार पार पाडत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका ट्रॅव्हल कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीने सत्यजित न्यूजकडे कथन केली आहे.
कधी काळी मुलबाळ होत नाही म्हणून गुजरात राज्यात जाऊन एका गावातील अम्मांचा हात पोटावर फिरवून पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या गरजू परंतु अंधश्रद्धाळू महाराष्ट्रातून आता त्याच राज्यात जाऊन मुलगा की मुलगी याचे निदान करुन मुलीचा गर्भ असल्यास निर्दयीपणे तीला संपवून घरी येणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत हा एक चिंतेचा विषय आहे असे मत व्यक्त केले आहे.
असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यातही सुरु झाला असल्याची माहिती समोर येत असून याबाबत सत्यजित न्यूज लवकरच खरेखोटे काय याची शहानिशा करुन असा गैरप्रकार करणारांचे पितळ उघडे पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच हा प्रकार बंद करण्यासाठी जनजागृती व कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजेत हेही तेवढेच खरे.