पाचोरा ते वरखेडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी लोकप्रतिनिधी येतात की काय अशी जनमानसातून खमंग चर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०४/२०२३
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरण्यासाठी वारंवार आवाज उठवला परंतु पाचोराचे सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपर्यंत थातुरमातुर काम करुन एकप्रकारे वाहनधारकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे असेच म्हणावे लागेल.
तसेच आता पाचोरा शहरात माजी मुख्यमंत्री व बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जेष्ठ नेते मा. श्री. उध्दव ठाकरे साहेब हे येत्या २३ एप्रिल २०२३ रविवार रोजी येणार असून त्यांची प्रचंड अशी सभा होणार आहे. या सभेसाठी मराठवाडा, जामनेर, भुसावळ तसेच चाळीसगाव तालुक्यातील बहुसंख्य चाहते सभेसाठी येणार आहेत.
ही बाब लक्षात घेऊन पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पाचोरा ते वरखेडी दरम्यान पडलेले खड्डे भरण्यासाठी मागील पाच वर्षांपासून खडी व दगडाचा कच टाकून ठेवला आहे. परंतु आज २१ एप्रिल २०२३ शुक्रवार उजाडला तरीही खड्डे बुजवण्यात आले नसून खड्ड्यांजवळ खडी व दगडाचा कच तसाच पडलेला असल्याने अजूनच रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच उद्या अक्षयतृतीया सणानिमित्त सुट्टी असून रविवारी शासकीय सुट्टी आहे. यामुळे हे खड्डे मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेच्या अगोदर भरली जातील व येणाऱ्या, जाणाऱ्यांची गैरसोय दूर होईल अशी कोणतीही परिस्थिती दिसून येत नसल्याने जनमानसातून उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत.
यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे खड्डे भरण्यासाठी तालुकास्तरावर येणारे काही प्रतिष्ठित नेते, लोकप्रतिनिधींच्या हस्ते हे खड्डे भरण्यासाठीचे मुहूर्त मुहूर्त काढून त्यांच्या हस्ते खड्डे भरणे व रस्ता दुरुस्ती करणेसाठी थांबले आहेत की काय असा संभ्रम जनतेतून निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे.