आज जळगाव जिल्ह्यात आढळले तब्बल ४१४ बाधीत पैकी १७ पाचोरा तालुक्यात,उपाययोजनांची गरज.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०१/२०२२
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या आजच्या आकडेवारीनुसार कोरोना सुसाट वेगाने पसरत आहे. जळगावसह भुसावळ शहरात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. जिल्ह्यात दिनांक २१ जानेवारी शुक्रवार रोजी एकाच दिवसात तब्बल ४१४ रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
आज मिळालेल्या माहितीनुसार नव्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला असून
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ५८१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४७ हजार ११९ नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख ४१ हजार ३१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली तसेच शुक्रवारी २२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
जळगाव जिल्ह्यातील आजरोजी नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांची आकडेवारी पुढील प्रमाणे असून आजरोजी पाचोरा तालुक्यातील आकडेवारीने वेग घेतला आहे. जळगाव शहर ११४, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ ७९, अमळनेर २०, चोपडा ७८, पाचोरा १७, भडगाव ०५, धरणगाव ०४, यावल ०१, एरंडोल ०४, जामनेर ३२, रावेर ००, पारोळा १६, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर ००, बोदवड ००, अन्य जिल्हा ०२
पाचोरा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आजरोजी १७ असून ही आकडेवारी पाचोरा तालुक्यातील जनतेसाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून शासन, प्रशासनाने तसेच सामाजिक संघटनांनी जास्तीत जास्त जनजागृती करत कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून प्रत्येक नागरिकांनी आपापल्या गावपरिसरातून काळजी घेतल्यास नक्कीच आपण कोरोनाला पळवून लाऊ शकतो. फक्त गरज आहे ती जबाबदारी स्विकारण्याची.