दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०१/२०२३

जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील उत्तम भिला चव्हाण यांच्या मालकीची गिर गाय काल दिनांक ३१ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी जंगलात चरण्यासाठी गेली असता गाय चरत असतांनाच तिच्या तोंडात कोणत्यातरी स्फोटकाचा स्फोट होऊन या घटनेत गायीचा जबडा फॅक्चर होऊन पूर्णपणे फाटल्याने गाय जबर जखमी झाली आहे. या घटनेत उत्तम भिला चव्हाण यांचे अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता पाचोरा व जामनेर तालुक्यातील राखीव जंगलासह शेती शिवारात रानडुक्कर, ससे, नीलगाय व हरणांच्या शिकारीसाठी काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या जंगलातील प्राण्यांची शिकार करुन मास विक्री करुन रग्गड पैसा कमावत आहेत. परंतु जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी डेटोनेटर कॅप सारख्या स्फोटकांचा वापर करत असल्याने हि स्फोटके पाळीव प्राणी, शेतमजूर व शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. याचेच जिवंत उदाहरण या घटनेतून सिध्द झाले असून अशीच घटना मागील महिन्यात पाचोरा तालुक्यातील नांदुरा, सामनेर परिसरात घडली असल्याने ही स्फोटके शिकाऱ्यांना मिळताच कशी हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी डेटोनेटर कॅप सारख्या स्फोटकांचा वापर केला जात असून ही स्फोटके यांना मिळतातच कशी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या काळ्या बाजारात मिळणाऱ्या स्फोटकांचा तपास होऊन अश्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात अश्या स्फोटकांमुळे एखाद्यावेळेस मोठी जिवीतहानी होऊ शकते किंवा कुणावरही हल्ला करण्यासाठी या स्फोटकांचा वापर केला जाऊ शकतो अशी भिती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याला कारणीभूत म्हणजे पाचोरा व जामनेर तालुक्यातील वनखात्याच्या कारभार रामभरोसे सुरु असल्याबाबतचा अनुभव मागील काही वर्षांपासून येत आहे. कारण की पाचोरा व जामनेर तालुक्यात राखीव जंगलासह शेती शिवारात तसेच इतर शासकीय हद्दीतील परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असून मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांची शिकार केली जात आहे. याबाबत सत्यजितच्या न्यूजच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवून सुध्दा काहीएक फायदा होत नसल्याचे जाणवते कारण प्रसारमाध्यमांनी बातमी दिल्यानंतर कारवाईचा फक्त देखावा निर्माण करुन थातुरमातुर कारवाई करुन शासन व जनतेला दाखवण्यासाठी देखावा निर्माण केला जातो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

यामागील कारणांचा शोध घेतला असता जनमानसातून मिळालेल्या वनविभागाचे अधिकारी उंटावरून शेळ्या चारत असल्याने कर्मचारीवर्ग मुख्यालयात रहात नसून त्यांना नेमून दिलेल्या जंगलात फेरफटका मारायला येत नसल्याने पाचोरा व जामनेर तालुक्यातील राखीव जंगलासह इतर परिसरात जंगली प्राण्यांची शिकार करणारी टोळी व लाकुड व्यापाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून एकप्रकारे विरप्पन राज सुरु आहे की काय अशी शंका निर्माण होते. कारण वनविभागाचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी हेच यांना पाठीशी घालतात असे बोलले जाते कारण हे अधिकारी व कर्मचारी बऱ्याच वेळा लाकुड वखारी वर बसलेले किंवा लाकुड व्यापाऱ्यासोबत फिरतांना दिसून येतात असे काही निसर्गप्रेमींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.