पाचोरा तालुक्यात खाजगी सावकाराकडून शेतकऱ्यांचा छळ,शेती परत मागितल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०८/२०२२
सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यासह सगळीकडे खाजगी सावकारांचा ऊत आला असून खाजगी सावकरी करणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याने आता खाजगी सावकारांनी गरवंताच्या गरजेचा फायदा घेत लाखो रुपये किंमतीच्या जमीनी सावकारी देतांना अल्पशा रकमेत पक्के खरेदीखत करून घेत गावातील काही पंचांच्या साक्षीने व्याजासहित रक्कम परत मिळाल्यानंतर खरेदीखत करुन घेतलेली शेतजमीन परत देण्याच्या करारावर मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारी सुरु आहे.
परंतु काही सावकार ठरलेल्या (करार) बोली बंधनाप्रमाणे घेतलेले पैसे व्याजासहीत परत दिल्यावर सुध्दा शेत जमीनी परत नावावर करुन देण्यासाठी नकार देत आहेत. तसेच आमच्या विरोधात कुठेही तक्रार केल्यास आम्ही तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन तुम्हाला जेलमध्ये सडवून टाकू अशा धमक्या देत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याच खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावातील शेतकरी महिलेने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सोबतच्या महिलांच्या लक्षात हा प्रकार आल्यामुळे त्या महिलांनी संबंधित महिलेची समज घालत तिला आत्महत्या करण्यापासून वाचवले व पुढील अनर्थ टळला असल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मागिल कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊचा फटका व निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे तसा हंगाम हाती न आल्यामुळे तसेच शेतकऱ्यांनी केलेली मेहनत बि, बियाणे, लागवड, फवारणी, शेती मशागत, मजुरांची मजुरी हा खर्चही हाती न आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच घर, प्रपंचासाठी होणारा खर्च, मुलामुलींचा शैक्षणिक खर्च तर काही घरातुन आजारपण, मुलामुलींची लग्ने हा खर्च भागवण्यासाठी पैशांची गरज असल्याने संसाराचा गाडा ओढण्यासाठी थोडक्यात (मरणाला रात्र आडवी) करण्यासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज काढणे गरजेचे असल्याने संबंधित महिलेने एका खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते.
ठरलेल्या बोली बंधनाप्रमाणे घेतलेले कर्ज ठराविक मुदतीत परत करण्यासाठी संबंधित महिलेने पैशांची जमवाजमव करुन घेतलेली मुद्दल व झालेल्या व्याजासह रक्कम घेऊन संबंधित सावकाराकडे पैसे घ्या व माझी शेतजमीन मला परत माझ्या नावे करुन द्या अशी मागणी केली असता संबंधित सावकाराने सरकारी किंमती प्रमाणे जी किंमत होईल तेवढे पैसे मोजा तरच जमीन नावावर करुन देतो असे सांगून जर आमच्या विरोधात कुठेही तक्रार केल्यास आम्ही तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून संपवून टाकू अशी धमकी दिल्यामुळे संबंधित महिलेने पोळा सण दोन दिवसावर असतांनाच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता परंतु सुदैवाने सोबतच्या महिलांच्या लक्षात येताच पुढील अनर्थ टळला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे संबंधित सावकाराने त्या महिलेच्या मुलाला मोबाईलवर मुद्दल, होणारे व्याज यांच्या हिशोबासह संदेश पाठवून धमकीच्या भाषेत मजकूर लिहून पाठवला असून त्या मजकूरात धमकी भरली असल्याने संबंधित कुटुंब धास्तावले असून या जाचातून सुटका करून घेण्यासाठी काय करावे या विवंचनेत संबंधित कुटुंब तणावाखाली असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे.
असे बरेचसे अनाधिकृत सावकारी करणारे सावकार शहरात व खेड्यापाड्यात विनापरवाना, बिनबोभाटपणे सावकारी करुन अजगरासारखे गोरगरीब गरवंताच्या स्थावर मालमत्ता गिळंकृत करून कोणतीही आवक नसतांना अल्पशा कालावधीत लक्षाधीश झाले आहेत. अश्या अनाधिकृत सावकारांची चौकशी होऊन त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.