दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०५/२०२३

संपूर्ण महाराष्ट्रात प्रति पंढरपूर तसेच शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी या गावत आजपर्यंत सर्वधर्म बांधव गुण्यागोविंदाने एकत्र रहात आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून बोटावर मोजण्याइतक्या काही गावगुडांमुळे शेंदुर्णी गावाच्या कायदा, सुव्यवस्थेला गालबोट लागले आहे.

शेंदुर्णी नगरपंचायतीत जनतेने निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीने परवा एक महिलेच्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध कुकर्म केल्याची घटना ताजी असतांनाच काल दिनांक २२ मे २०२३ सोमवार रोजी रात्री अंदाजे आठ वाजेच्या सुमारास अक्षय वसंत गुजर वय वर्षे २३ हा जिम मध्ये व्यायम करुन घराकडे जात असतांना कमल किसन नगरमध्ये भरवस्तीत दबा धरुन बसलेल्या पाच ते सहा जणांनी अक्षय गुजरवर जीवे मारण्याच्या हेतूने अचानकपणे हल्ला चढवून चाकुने व रॉडने हातापायावर सपासप वार करुन मारेकऱ्यांनी पळ काढल्याची घटना घडली आहे.

अक्षय गुजरवर अचानकपणे झालेल्या हल्ल्यात तो जबर जखमी झाला होता परंतु त्याने घाबरुन न जाता एका व्यक्तीच्या मदतीने शेंदुर्णी येथील पोलीस स्टेशनला जाऊन घडलेला प्रकार सांगितला अक्षय याचेकडून संपूर्ण माहिती जाणून घेत अक्षय हा जबर जखमी असल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्याला त्वरित शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी रवाना केले. परंतु अक्षयची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे.

कमल किसन नगरमध्ये काही हल्लेखोरांनी एका तरुणावर हल्ला केल्याची बातमी शेंदुर्णी शहरात वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व एकच गोंधळ उडाला जखमी अक्षय गुजरने सांगितलेल्या माहितीनुसार शेंदुर्णी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेत काही वेळातच दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप पाटील व त्यांचे सहकारी इतर मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

या घटनेबाबत जखमी अक्षय गुजर याच्या आईने पोलीस स्टेशनला येऊन अक्षयवर हल्ला करणारे दर्शन राजु गुजर, लखन विठ्ठल गुजर, रामु विठ्ठल गुजर, राजु भिला गुजर, सचिन अनिल धनगर व इतर तीन ते चार जणांनी जुन्या वादातून अक्षयवर हल्ला केल्याची फिर्याद दिल्यावरुन वरील सर्व संशयित आरोपींविरोधात भा. द. वी. कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या संशयित आरोपींचा कसुन शोध सुरु आहे. तसेच कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे साहेब हे शेंदुर्णी गावातच ठाण मांडून बसले असून आरोपींची गय केली जाणार नाही. जनतेने शांतता राखुन पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.