सातगाव डोंगरी येथील १४ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/११/२०२२

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील एका १४ वर्षीय मुलाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक ०६ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली या घटनेबाबत सातगाव डोंगरी गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सातगाव डोंगरी येथील संतोष लक्ष्मण आवारे यांनी गावातीलच एका शेतकऱ्याची शेती अर्ध्या वाटे, हिश्याने केलेली आहे. याच शेतजमीनीत कापूस पिकाची लागवड केली आहे. तसेच संतोष आवारे पत्नी व मोठ्या मुलासोबत हे दिनांक ०६ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेलेले होते. तसेच मयत ऋषिकेश हा दिवसभर बटाईने केलेल्या शेतावर शेळ्या व बैल चारण्यासाठी गेलेला होता. नियमितपणे त्याने सायंकाळी बकऱ्या घरी आणून बांधून दिल्या व कोणालाही काही न सांगता घरुन निघून गेला तो उशिरापर्यंत घरी परतलाच नाही.

तर दुसऱ्याच्या शेतात गेलेले आई, भाऊ व वडील संतोष आवारे हे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास परत आल्यानंतर ऋषिकेश घरी दिसून आला नाही म्हणून त्यांनी गावातीलच नातेवाईक व गावभर तपास केला मात्र ऋषिकेश कुठेही मिळून न आल्यामुळे ऋषीकेशचे वडील व मोठा भाऊ अनिकेत हे ऋषीकेशला शोधण्यासाठी शेताकडे गेले असता सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ऋषिकेश हा शेतातील झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

हे दृश्य पाहून मयत ऋषीकेशचे वडील संतोष आवारे व भाऊ अनिकेत यांनी हंबरडा फोडला व काही क्षणातच संतोष आवारे हे बेशुद्ध होऊन पडले ही घटना गावात माहीत पडताच गावातील महिला, पुरुषांनी शेताकडे धाव घेतली व घडलेला प्रकार पाहून सगळ्यांचे मन हेलावून गेले. सातगाव डोंगरी येथील पोलिस पाटील दत्तू पाटील यांनी त्वरित पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर खबर दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून रीतसर पंचनामा करुन ऋषिकेश याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनानंतर ऋषिकेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल आर. के. पाटील व सहकारी करत आहेत.

“संतोष आवारे”
आमच्या घरात खेळीमेळीचे वातावरण होते तसेच आम्ही ऋषिकेश याला कोणतेही काम करण्यासाठी सक्ती करत नव्हतो व घरात कुणाशीही, कुठलाही वादविवाद किंवा भांडणतंटे झालेले नसतांना अवघ्या १४ वर्षं वयाचा माझा मुलगा आत्महत्या करुच शकत नाही असे मत संतोष आवारे यांनी व्यक्त केले असून माझ्या मुलाची ही आत्महत्या नसून घातपात झाल्याचा माझा संशय आहे असे मत व्यक्त करत या घटनेबाबत सखोल तपास व चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या