दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१०/२०२२

सद्यस्थितीत बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणी, शाळ, कॉलेजच्या जवळपास, रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टवाखोरी वाढली असून यात जास्त करुन काही शाळा, कॉलेजचे विद्यार्थी किंवा ज्यांचा शैक्षणिक क्षेत्रात काही एक संबंध नाही असे टवाळखोर सगळीकडे पहावयास मिळतात. व याच टवाळखोरांना वैतागून समाजात मोठ्या प्रमाणात भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अश्याच एका टवाळखोर विद्यार्थ्यांला एका शिक्षकाने हटकले असता त्या टवाळखोराने थेट शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाच्या अंगावर धाऊन जाऊन शर्टाची कॉलर पकडून लाथा, बुक्क्यांचा मार देत गळ्याजवळ भोसकून नरडी दाबण्याचा प्रयत्न केला यावरच या टवाळखोर थांबला नाही तर त्याने जवळच पडलेल्या लाकडी दंडुका घेऊन शिक्षकाच्या उजव्या पायाला व पाठीवर जोरदारपणे मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामविकास विद्यालय आज घडीली असून या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामविकास विद्यालयात सद्यस्थितीत सहामाही परीक्षा घेतल्या जात आहेत. आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ शुक्रवारी रोजी ग्रामविकास विद्यालयात पेपर सुरु होता. पेपर संपल्यानंतर याच विद्यालयात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी सोमेश अरुण धनगर हा त्याच्या शर्टचे दोन बटणं उघडे ठेवून चित्रपटात शोभेल अशी एखाद्या मवाल्यासारखी शर्टाची कॉलर फिल्मी स्टाईलने ताठ करुन तोंडात गुटखा गळ्यात साखळ्या (चैन) व हातात लोखंडी चैन फिरवत शाळेच्या प्रांगणात फिरतांना आढळून असता शाळेतील शिक्षक मा. श्री. मनोज सोनवणे यांनी सोमेश धनगरला हटकले व शिस्तीत रहाण्यासाठी सांगितले असता याचा राग येऊन सोमेश धनगर याने शिक्षक मा. श्री. मनोज सोनवणे यांच्या अंगावर धाऊन जात चित्रपटालाही लाजवेल अशा स्टॉईलमध्ये शर्टची कॉलर पकडून लाथा, बुक्क्यांचा मार देत नरड्याजवळ नखाने ओरबाडून काढले एवढ्यावरच सोमेश धनगर याचे समाधान न झाल्याने त्याने जवळच पडलेला लाकडी दांडा उचलून शिक्षकांच्या उजव्या पायावर व पाठीवर जोरदारपणे जीवघेणी मारहाण केली यावेळी इतर शिक्षकांनी सोमेश धनगर याला समजवण्याचा प्रयत्न केला असता सोमेश धनगर याने सर्व शिक्षकांना अश्लील शिवीगाळ करत तुम्ही बाहेर भेटा पाहून घेईल अशी धमकी देऊन पळ काढला व तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

या अचानकपणे झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे विद्यालयात एकाच गोंधळ उडाला होता व शिक्षकवर्ग भांबावून गेला होता. हल्लेखोर पळून गेल्यानंतर इतर शिक्षकांनी मनोज सोनवणे यांना मानसिक आधार देत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला पाठवून हल्लेखोर विद्यार्थी सोमेश धनगर याच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला भादवि कलम ३२३, ३२४, ३५२, २९४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून हल्लेखोराला पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी कार्यतत्परता दाखवत तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच शिताफीने अटक केली आहे.