कुऱ्हाड खुर्द येथे अवैधधंदे करणारांचे रक्तरंजीत धुलीवंदन. गावात दहशतीचे सावट..

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०३/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द हे गाव सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी दारु या अवैधधंद्यासाठी प्रसिद्धीला आले आहे. येथील अवैधधंदे आसपासच्या दहा खेड्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या गावातील अवैधधंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत म्हणून कुऱ्हाड येथील सुज्ञ नागरिक व महिलांनी बऱ्याच वेळा अर्ज, फाटे केले आंदोलने करून पाहिली ग्रामस्थांच्या तक्रारी वरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन कडून वारंवार कारवाईचे सत्र सुरू ठेवले. मात्र कायद्यातील पळवाटा व या अवैधधंदे करणाऱ्यांना मिळणारा राजाश्रय वरचढ ठरला व आजही या कुऱ्हाड खुर्द गावात अवैधधंदे राजरोसपणे, दिन दहाडे, रात्रंदिवस सुरू आहेत.
हे अवैधधंदे राजरोसपणे सुरु असल्याने या अवैधधंद्यातुन लाखो रुपये कमाई होत असल्याने यांच्या अंगावर चरबी व खिशात पैसा जास्त झाल्यामुळे ते आता मस्तावले असून कायदा आमच्या बापाचाच आहे असे समजून त्यांनी आता गाव परिसरात गुंडागर्दी सुरू केली आहे. या सगळ्या त्रासाला कंटाळून काही नागरिक तक्रारी करण्यासाठी पुढे येतात परंतु संबंधित अवैधधंदे करणारे तक्रारदारांना दमदाटी करून खोट्या गुन्ह्यात अडवतात किंवा तशी धमकी देतात. याच कारणामुळे कुऱ्हाड गावातील अवैधधंदे दिवसेंदिवस भरभराटीला जात आहेत.
आज सकाळी धुलीवंदनाच्या दिवशी या अवैधधंदे करणारांमध्ये अवैधधंद्याच्या स्पर्धेतून जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत काठ्या, लाठ्या, लोखंडी गज तसेच तलवारी निघाल्याची चर्चा कुऱ्हाड खुर्द गावासह आसपासच्या खेड्यात सुरु असून कुऱ्हाड खुर्द गावातील वडर समाजाची वस्ती असलेला वाडा व गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
या अवैधधंदे करणाऱ्या दोन गटात हाणामारी झाल्यानंतर हे दोघेही गट पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी गेले आहेत. परंतु गावातील काही स्वताला प्रतिष्ठित समजून घेणारे झारीतले शुक्राचार्य हा गुन्हा नोंद होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहेत. तसेच या हाणामारीत काही व्यक्तींना जास्त मार लागला असून काही जखमी झाले आहेत. परंतु गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंद होऊ नये म्हणून हाणामारीतील दोघेही गटांनी या जखमींना पाचोरा व इतर ठिकाणी खाजगी रुग्णालयात दाखल करून सारवासारव करण्याच्या प्रयत्न करत आहेत.
मात्र कुऱ्हाड खुर्द गावात हाणामारीचे सत्र कायमस्वरूपी सुरू आहे. तसेच या भांडणात चक्क तलवारी निघाल्याची चर्चा असल्याने संबंधितावर कडक कारवाई होऊन अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे. अन्यथा या अवैधधंदे करणारांच्या गुंडागर्दीमुळे या गावात मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.