पाचोरा शहरात विवाहितेची आत्महत्या की हत्या उलटसुलट चर्चेला उधाण, घातपात असल्याचा भावाचा आरोप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२२
पाचोरा शहरातील गणपती नगरमध्ये २६ वर्षीय विवाहितेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तिची हत्या झाल्याचा संशय मृत विवाहितेच्या भावाने व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रिया शहा देव (वय – २६) रा. भोपाल (मध्य प्रदेश) हिचा विवाह एम. एस. एफ. मध्ये सेवेत असलेले पाचोरा येथील विनोद सुरवाडे राहणार गणपती नगर, पुनगाव रोड, पाचोरा यांचेशी पाचोरा येथे दिनांक ३० आॅगस्ट २०२१ रोजी मोठ्या थाटात पार पडला.
दरम्यान विवाह झाल्यापासुन पती – पत्नी मध्ये किरकोळ कारणावरून नियमित भांडण होत असत. याबाबत प्रिया हिने वारंवार आपल्या माहेरच्या मंडळींना याबाबत कल्पना दिली होती. दिनांक ०७ ऑगस्ट २०२२ रविवार रोजी सुद्धा प्रिया व विनोद यांच्यात सकाळ पासुनच कडाक्याचे भांडण सुरू झाले होते अशी माहिती समोर येत आहे. प्रिया हिला पतीकडून होणारा त्रास सहन न झाल्याने तीने दिनांक ०८ ऑगस्ट रविवार रोजी रात्री ९ ते १२ वाजेला टप्प्या, टप्प्याने भोपाल येथे वास्तव्यास असलेल्या आपली बहिण दिपाली शेजवाल भ्रमणध्वनीद्वारे पती विनोद हा दिवसभर भांडण करत असल्याची कल्पना दिली होती.
दरम्यान वाद विकोपाला जाऊ नये म्हणून प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व त्याचे मेहुणे शशांक शेजवाल हे प्रिया व विनोद यांना समजविण्यासाठी तसेच येणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी बहिण हिस भोपाल येथे घेवुन जाण्याच्या उद्देशाने भोपाल येथुन दिनांक ०७ ऑगस्ट रविवार रोजी रात्री पाचोरा येथे येण्यासाठी निघाले होते. याबाबत शशांक शेजवाल यांनी विनोद सुरवाडे यांना पुर्व सुचना देखील दिली होती.
मात्र नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. दिनांक ८ ऑगस्ट सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास विनोद सुरवाडे यांच्या मामी ह्या प्रिया हिस चहा देण्यासाठी खोलीत गेल्या असता प्रिया हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. एका बाजूला प्रियाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली तर दुसरीकडे त्याच वेळी प्रियाचा भाऊ भोपाळ येथून नेमका पाचोरा बहिणीच्या घरी पोहचला होता.
प्रिया हिच्या भावाने आपली बहीण फाशी घेऊन मृत झाल्याचे पहाताच त्याने एकच हंबरडा फोडला. तसेच माझी बहिण आत्महत्या करुच शकत नाही. असा संशय प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व मेहुणे शशांक शेजवाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच घटनास्थळाची वस्तुस्थिती देखील संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पाचोरा पोलिस काय भुमिका घेतात याकडे शहर वासियांचे लक्ष लागून आहे