उपोषणकर्त्याच्या धास्तीने वडगाव आंबे ग्रामपंचायतीला कुलुप. समस्या मांडण्यासाठी ग्रामस्थांनी जावे तरी कुणाकडे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे या गावात गावठी डुकरांचा उपद्रव वाढला असून ही गावठी डुकरांचा गावात रात्रंदिवस त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या गावठी डुकरांवर गावातील मोकाट कुत्रे हल्ला चढवून त्यांची शिकार करून खात असल्याने डुकरे व कुत्र्यांचा सामना दिवसभर पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे या गावठी कुत्र्यांना मांसाहाराची व रक्ताची चटक लागल्याने हे मोकाट कुत्रे आता लहान, मोठ्या लोकांवर हल्ले चढवत आहेत. डुकरांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली असून ही डुकरे पावसाळ्यात गावच्या आसपासच्या शेतात शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांची नासाडी करतात याबाबत मागील तीन वर्षांपासून वारंवार अर्जफाटे व तक्रारी केल्यानंतर ग्रामपंचायतीने वारंवार नोटीसा बजावल्या आहेत. तसेच पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला संबंधित डुकरांच्या मालकावर कारवाई करण्यात यावी याकरिता तक्रारी केल्या आहेत.
मात्र संबंधित डुकरांचा मालक हा कुणालाही जुमानत नसल्याने डुकरांच्या त्रासापासून कायमस्वरूपी सुटका व्हावी म्हणून दिलीप जैन यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊन येत्या १४ जून २०२२ मंगळवारपर्यंत गावातील डुकरांचा बंदोबस्त न झाल्यास दिनांक १५ जून २०२२ बुधवारी वडगाव आंबे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते.
या निवेदनाची दखल घेऊन वडगाव आंबे ग्रामपंचायतीने पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी संबंधित डुकरांच्या मालकाला बोलावून येत्या पाच दिवसात संपूर्ण डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत सांगितले आहे. मात्र ही सुचना देऊन आज रोजी चार दिवस झाले आहेत तरीही डुकरांचा बंदोबस्त झालेला नाही. तसेच आज दिलीप जैन हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार होते हे माहीत असल्यावर ही ग्रामपंचायत सरपंच किंवा ग्रामसेवक यांनी उपोषणकर्त्यांना योग्य तो खुलासा न करता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून निघुन गेले असल्याने उपोकर्त्यांनी दाद कुणाकडे मागवी हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तसेच वडगाव आंबे ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक यांनी कोणताही खुलासा केला नसून ग्रामपंचायतीचे सुनील निकम यांच्या हस्ते मी आपणास खुलासा पत्र लिहून देणार असल्याचे भ्रमणध्वनीवर वारंवार सांगत आहेत. परंतु आता चार वाजले तरीही कोणतेही आश्वासन किंवा खुलासा मिळाला नसल्याने ग्रामसेवक आप्पांनी सांगितल्याप्रमाणे आज खुलासा न मिळाल्यास दिलीप जैन हे उद्या सकाळ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.