*सानुल्यांच्या मृत्यूची पेटिका!!* मृत्यू कार विनोद अहिरे .

भंडाऱ्यातील दहा सानूल्यांचा आग्निंच्या धुराच्या लोळात गुदमरून अंताची बातमी ऐकली, आणि डोळे अश्रूंनी भरून गेले. कारण त्या नुसत्या दहा सानुल्यांचा मृत्यु नव्हता; तर त्या दहा मातांच्या मातृत्वाचा, त्यांच्या वात्सल्याचा, त्यांच्या प्रस्तुती वेदनेचा तो मृत्यू होता. माझा सोनुला सोनुला, माझी छकुली छकुली हे अंगाई गीत त्यांच्या मुखातून निघण्याच्या आतच त्याचा छकुला, त्यांची छकुली त्यांच्या जीवन प्रवासाला सुरुवात करण्याच्या अगोदरच अनंताच्या प्रवासाला निघून गेली होती. तीही कायमची.
आणि आता त्या माता आपल्या वासराला परत बोलवण्यासाठी हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडत आहेत. त्यांच्या वात्सल्याच्या चक्षूतून वेदनेच्या अश्रुधारा आणि आपल्या बाळाला पाजण्यासाठी त्यांच्या अमृतकुंभातून दुधाच्या धारा एकाच वेळी निथळत आहेत, तरीही त्यांचे वासरू परत येत नाही. कारण त्यांच्या सानुल्यांला जी सुरक्षेची पेटिका दिली होती, तीच पेटिका त्यांच्या मृत्यूची शवपेटी झाली होती.
त्या हंबरनाऱ्या मातांच्या आक्रोशाने तो मृत्यूही भयभीत झाला असेल, आणि म्हणत असेल हे माते मला क्षमा कर, अगोदर मी तुला तुझ्या सानुल्याच्या जन्म प्रसंगी मृत्युकळा दिल्या त्यावर देखील तुझ्या ममत्वाने विजय मिळविला, आणि तू हसत हसत त्या मृत्यूकळा सहन करून मला पराजित केलेस, तेच शल्य माझ्या मनाला डाचत होतं, म्हणूनच मी तुझ्या सानूल्याला मी माझ्या सोबत घेऊन गेलो. परंतु तुझ्या लेकराच्या विरहाच्या वेदनांनी, तुझ्या किंकाळ्यांचा ध्वनी, तुझा आक्रोश, तुझ्या नयनातून निघणाऱ्या अश्रुधारा आणि तुझ्या अमृत कुंभातून निथळनाऱ्या दुधाच्या धारा पाहून माझा पुन्हा पराजय झाल्याची जाणीव मला होत आहे, हे माते मला माफ कर..
संपूर्ण सृष्टीवरअधिराज्य गाजवणारा हा मृत्यू देव तुझ्या ममत्वापुढे नतमस्तक होत आहे. हे वात्सल्यसिंधू मला क्षमा कर……
हे लिहीत असताना माझीही लेखणी थरथरली, डोळ्यात अश्रू आणि लेखणीतून शब्द एकाच वेळी बाहेर पडत आहेत. इतक्या वेदना मला “मृत्यू घराचा पहारा” लिहिताना सुद्धा झालेल्या नव्हत्या, त्या भंडारा जिल्ह्यातील दहा बालकांच्या अंताने होत आहे.
एक मात्र नक्की जो कोणी या घटनेला जबाबदार असेल त्याला या दहा मातांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही. हे निसर्गचक्र आहे. त्या बेजबाबदार लोकांना त्या मातांचे दुःखाश्रू एक दिवस उष्ण जलाशयाचे रूप घेतील आणि ते बेजबाबदार लोक तडफडून तडफडून मरतील यात तिळमात्र शंका नाही.
हे सगळं लिहिताना महाभारतातील प्रसंग आठवला दुर्वास ऋषीच्या वेदहुती मंत्रापासून कुंतीदेवीला सूर्य देवापासून कुमारी अवस्थेत पुत्रप्राप्ती झाली. पण समाज काय म्हणेल, या बदनामीच्या भीतीने कुंतीदेवीने बाळ कर्णाला एका लाकडी पेटीकेत अश्व नदीच्या प्रवाहात सोडून दिले होते. ती पेटिका पाच नद्यांच्या प्रवाहातून हजारो मैलाचा प्रवास करून सुद्धा त्यामध्ये बाळ कर्ण सुरक्षित राहिला, पण आपण मात्र नवजात शिशुंना जीवदान देण्यासाठी तयार केलेली काचेची पेटीका मात्र मृत्यूची पेटीका ठरली हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
हे बाळांनो आम्हाला क्षमा करा..
पो.ना. विनोद पितांबर अहिरे पोलीस मुख्यालय जळगाव ९८२३१३६३९९