राजनंदिनी संस्थेतर्फे,शवविच्छेदन विभातील कर्मचाऱ्यांचा सत्कार
दिलीप जैन.(पाचोरा)दिनांक=१३/११/२०२०
जळगाव राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था आणि आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.जयदीपसिंग छाबरा यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन विभागामधील डॉक्टरांचे मदतनीस कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार अधिष्ठातांच्या दालनात करण्यात आला. या सत्कारामुळे डॉक्टरांचे मदतनीस भारावले.
या वेळी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे मदतनीस कर्मचारी अनिल घेंगट, सुधीर करोसिया, भगवान चव्हाण, पवन जाधव, मनोज पथरोड यांचा विशेष सत्कार वैद्यकीय अधिकारी प्रा.डॉ.वैभव सोनार, प्रा.डॉ.संगीता गावीत, प्रशासकीय अधिकारी आर.व्ही.शिरसाठ, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ड्रेस देवून करण्यात आला.
प्रारंभी धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.शवविच्छेदन विभागातील अतिशय सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार या पूर्वी कोणी केलेला आहे, असे आठवत नाही. त्यामुळे या सत्कारामुळे या सेवाभावी कामासाठी अजून कामाची प्रेरणा मिळाली. या सत्कारामुळे भारावलो, अशा भावना सत्कारार्थी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. कोरोनाच्या कालावधीत सुरुवातीला रुग्णाच्या मु्तदेहाला अनेक नातेवाईकांनी उचलून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे, सुद्धा टाळले. अशा वेळी शवविच्छेदन विभागातील सामान्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिमतीने कोरोना यौद्धा म्हणून एखाद्या सैनिकासारखे ते मु्तदेह उचलून त्या संबंधितांच्या गावात अथवा जळगावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पोहचविले. त्या कर्मचाऱ्यांनी हे काम अहोरात्र केले. त्यामुळे त्यांच्या या जिकरीच्या कामाचे कौतुक मान्यवरांनी केले. या आदर्श उपक्रमाबाबत डॉ. छाबरा व संस्थेसंदर्भात डॉक्टरांनी गौरवोद्गार काढले.
उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित घटकातील कर्मचाऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, त्यांच्या सेवाभावाचा गौरव व्हावा, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करण्यात येतात, असे संस्थेच्या अध्यक्षा वाघ यांनी सांगितले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघ यांनी केले. दरम्यान, संस्थेतर्फे
या अगोदरही “गोड दसरा” हा उपक्रम राबवण्यात आला. यात हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा सत्कार सिंधी कॉलनीतील सेवामंडळात करण्यात आला, असेही या वेळी सांगण्यात आले.