सत्यजित न्यूजच्या बातमीचा इफेक्ट, अंबाडी शिवारातील शेतकऱ्यांना मिळाला नविन ट्रान्सफॉर्मर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथून जवळच असलेल्या आंबाडी शिवारातील भोई नावाने ओळखली जाणारी (डीपी) ट्रांसफार्मर मागील पंचवीस दिवसापासून नादुरुस्त झालेला होता. या ट्रांसफार्मरवर अधिकृत विद्युत ग्राहक असलेल्या शेतकऱ्यांनी सक्तीने बिल वसुलीच्या वेळी तीस हजार रुपये बिल भरले होते. तेव्हा त्यांचा ट्रांसफार्मर सुरू करण्यात आला होता. परंतु काही दिवसातच हा ट्रांसफार्मर जळाल्याने मागील २५ दिवसांपासून आंबाडी शिवारातील भोई नावाने ओळखल्या जाणाऱ्या ट्रांसफार्मरचा विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने या शिवारातील मका, गहू, दादर, हरभरा, पपई, टरबूज ही पिके बऱ्याच प्रमाणात सुकली असून बाकीची पिके सुकण्याच्या मार्गावर होते.
पिके सुकू नयेत म्हणून ट्रांसफार्मर त्वरित बदलून मिळावा याकरिता शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीचे शेंदुर्णी येथील कनिष्ठ अभियंता मा.श्री. सुनील चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिले भरण्यासाठी सक्ती केली व बिले भरल्यावर ट्रांसफार्मर दिला जाईल अशी अट घातली होती. या अटीनुसार या ट्रान्सफॉर्मर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी उधार, उसनवारी करुन पै, पै जमवून ९० हजार रुपये जमा करून मागील पंचवीस दिवसापूर्वी भरुन सुध्दा २५ दिवसाचा कालावधी उलटले तरीही सुद्धा संबंधित अधिकारी ट्रांसफार्मर न देता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने कळमसरा येथील शेतकरी संतप्त झाले होते.
तसेच शेतकऱ्यांना लवकर ट्रांसफार्मर मिळावा म्हणून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सौ. वंदनाताई पाटील यांनी कनिष्ठ अभियंत्या पासून तर वरिष्ठांपर्यंत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सुद्धा हे मगरुर अधिकारी फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांना सतावत होते. या विद्युत वितरण अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांनी राबराब राबून रात्रंदिवस मेहनत करुन जोपासलेली पिके पन्नास टक्के पिके हातची वाया गेली व उर्वरित पिके जाण्याच्या मार्गावर होती. म्हणून आत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत सत्यजित न्यूजकडे धाव घेऊन आपली परिस्थिती कथन करुन सत्यजित न्यूजच्या माध्यमातून विद्यूत वितरण कंपनीच्या विरोधात आवाज उठवला होता.
तसेच कळमसरा गावासाठी नियुक्त असलेला लाईनमन व विद्युत सहाय्यक या गावाला कधी दिसत नसून या गावाचा विद्यूतपुरवठा झिरो वायरमनच्या भरवशावर चालत असतो. तसेच मध्येच काही तांत्रिक बिघाड झाल्यास तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी संबंधित कर्मचाऱ्याकडून पैशाची मागणी केली जाते व पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही असे त्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले व येत्या दोन दिवसात ट्रांसफार्मर बदलून न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा दिला होता.
काल दिनांक २७ फेब्रुवारी रविवार रोजी सत्यजित न्यूजला (विद्युत वितरण कंपनीची मनमानी, बळीराजाच्या डोळ्यात पाणी. कळमसरा शिवारातील हिरवीगार पिके नष्ट होण्याच्या मार्गावर.) या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सौ. वंदनाताई पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली होती. म्हणून सत्यजित न्यूजची दखल घेत आज दिनांक २८ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळीच अंबाडी शिवारात नवीन ट्रान्सफॉर्मर घेऊन विद्रूप वितरणाचा ताफा दाखल होऊन फक्त दोन तासातच नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून विद्यूत पुरवठा त्वरित सुरू करुन देण्यात आल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी सत्यजित न्यूज व सौ. वंदनाताई पाटील यांचे आभार मानले आहेत.
महत्वाचे = कळमसरा येथे नियुक्त असलेले विद्यूत सहाय्यक व विद्युत कर्मचारी कायमस्वरूपी कळमसरा गावात येत नाहीत तरी त्यांना नियमितपणे मुख्यालयात पाठवावे तसेच याच परिसरात वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे उकळणाऱ्या झिरो वायरमनचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.