अंबे वडगाव परिसरात ३०० रुपये रोजंदारी देऊनही मजूरांचा तुटवडा, शेतकरी हैराण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१०/२०२१
यावर्षी जून महिन्यापासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने पिकांना फटका बसला होता. नंतरच्या काळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक हातचे गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नेमकी कापूस काढण्याची वेळ आल्यावर याच कालावधीत अतिवृष्टी झाल्याने कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात कापसाची झाडे सडली असून झाडावरील तयार कैऱ्या व कापसाची बोंडे सडल्याने पांढरा शुभ्र कापूस काळा झाला आहे.
जेमतेम कापूस हाती असल्यावर सुद्धा कापसाला योग्य भाव मिळत नसून कापूस लागवडी पासून, फवारणी, खते व वेचणी पर्यंतचा झालेला खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. त्यातल्या त्यातच सगळीकडे मजुरांचा तुटवडा भासत असून आज पर्यंत कापूस वेचणी साठी १५० ते २०० रुपये रोजा प्रमाणे मजूर कामावर येत होते व मजूर मिळत होते परंतु आता मजूर मिळत नसल्याने अंबे वडगावात प्रथमच दवंडी व्दारे (जाहीर आव्हान) करण्यात येत आहे.
परंतु आता ३०० रुपये रोज कबूल करून सुद्धा शेतकऱ्यांना शेतमजूर मिळत नसल्याने मोठी अडचण तयार झाली आहे. विशेष म्हणजे तीनशे रुपये रोज देऊनही सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत काम करण्याची अट असून यात दुपारी एक वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत जेवणाच्या सुट्टीसाठी वेळ देण्यात येणार असल्याचे ही शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे.
तरीसुद्धा मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणजे कापूस हे पीक आधीच पावसामुळे हातचे गेले आहे परंतु जे आहे ते घरात आणण्यासाठी धडपड करत असतांनाच मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्या पुढे हे नवीन मोठे संकट उभे राहिले आहे.
तरीही यासर्व संकटांना नजरेआड शेतकरी कसेबसे कापूस वेचणी करुन घरात आणत आहे. मात्र तो विकण्यासाठी गेल्यावर कापूस व्यापारी कापसाला मातीमोल भावाने मागत असल्याने यावर्षी शेत मशागत यात नांगरणी, वखरणी, बि, बियाणे, कापूस लागवडीसाठी लागणारी मजूरी खते, फवारणी, वेचणी हा शेती साठी लागलेला खर्चही हाती येतो की नाही अशी भिती व्यक्त केली जात आहे.