कोल्हे येथील जिल्हापरिषद शाळेच्या सरंक्षण भिंतीच्या बांधकामाची चौकशी व्हावी, ग्रामस्थांची मागणी
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव येथून जवळच असलेल्या कोल्हे येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेसाठी संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम ठरवून दिलेल्या नियम व अटी प्रमाणे होत नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करत या बांधकामाची चौकशी व्हावी व संबंधित ठेकेदाराकडून या संरक्षण भिंतीचे काम चांगल्या प्रतीचे करून घ्यावे अशी मागणी केली आहे. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करून ठेकेदारावर कारवाई न झाल्यास जिल्हा कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशाराही दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथे जिल्हापरिषद मराठी मुलांची शाळा असून पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. १६९ पटसंख्या अजून शिक्षक संख्या पाच आहे. या शाळेची गुणवत्ता तालुक्यात वाखाणण्याजोगी असल्याने या शाळाने तालुक्यात एक आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण केलेली आहे.
या शाळेच्या इमारतीचे संरक्षण व्हावे म्हणून (राजकारणातले विरोधक असलेतरी विकासकामांसाठी एकत्र येणारे) जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. गुलाबराव पाटील व जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुभाऊ काटे यांनी कोल्हे ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हापरिषदेच्या मराठी शाळेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १८,६५,१०० (अठरा लाख पासष्ट हजार शंभर रुपये) एवढा भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे.
परंतु सदरच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करणारा ठेकेदार हा ठरवून दिलेल्या निवेदे प्रमाणे काम करत नसून मनमानी करुन मनाला पटेल तसे काम करुन मलिदा लाटण्याचा प्रयत्न करत असून या कामाची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय या ठेकेदाराला पैसे अदा करु नये अशी मागणी कोल्हे ग्रामस्थांकडून होत आहे.
कारण कॉलमच्या फुटिंगसाठी जमिनीत योग्य त्या भुस्तरापर्यंत खोदकाम करणे गरजेचे असतांनाच, जमिन भुसभुशीत असतांना सुध्दा ठेकेदाराने फक्त दोन ते अडीच फुट खड्डे खोदून कॉलम उभे केले आहेत.
खोदकामात एम~१० सि.सि. ग्रेडचे (प्रतिचे) कॉंकीट ओतणे तसेच सलोह फुटिंग, कॉलम, बिम, कोपींग हे प्रस्तावित असतांनाही अश्या पध्दतीने काम झालेले नाही.
तसेच संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी ००.२३ मीटर जाडीचे काम करणे, संरक्षण भिंतीला दोन्ही बाजूने म्हणजे आतून व बाहेरून प्लास्टर करणे, संरक्षण भिंतीला रंगकाम करणे, कामाच्या ठिकाणी माहीतीचा फलक लावणे. अश्या बाबींची तरतूद आहे.
( कोल्हे ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारी नुसार येथील मराठी मुलांच्या शाळेच्या संरक्षण भिंतीच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता संबंधित ठेकेदाराने भिंतीचे बांधकाम योग्य पद्धतीने केलेले नसून रंगरंगोटी करून त्याने केलेल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसून येते.)
तसेच बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने व अगोदर आवश्यक असलेल्या सर्व बाबींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आलेली आहे. परंतु संबंधित ठेकेदार 【अधिकारी खिशात तर काय कोणाची बिशाद] अशी शेखी मिरवत संपूर्ण काम निविदे नुसार करत नसून अठरा लाखाचे काम फक्त दहा लाखात गुंडाळून पळण्याच्या प्रयत्नात असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे.
तसेच आमच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित संरक्षण भिंतीच्या कामाची चौकशी न झाल्यास आम्ही जिल्हा कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा ग्रामस्थांतर्फे सतीश गोपाळ यांनी दिला आहे.