कोल्हे येथील पोलिस पाटलांनी केलेल्या अतिक्रमण विरोधात तक्रार दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील पोलीस पाटील यांनी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायत मालकीचे जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी गुराढोरांसाठी पत्री सेड व गोठ्याचे अनाधिकृत बांधकाम केल्याबद्दल कोल्हे येथील एका ग्रामस्थाने यांच्या विरोधात मा. जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत तक्रारदार सतिष संतोष गोपाळ या तक्रारदाराने अर्जात नमूद केले आहे की कोल्हे येथील पोलीस पाटील अनिल शिवाजी पाटील यांनी अटलगव्हण रोड वरील गावानजीक ग्रामपंचायत मालकीच्या एका बुजवलेल्या विहिरीचे जागेवर स्वतःचे फायद्यासाठी अतिक्रमण करून त्या ठिकाणी गुरांसाठी पत्री शेड व गोठ्याचे बांधकाम केले आहे.
या बांधकामांमुळे अतिक्रमण केलेल्या जागी मागील पन्नास ते साठ वर्षांपूर्वीची गावासाठी वापरण्यात येणारी सार्वजनिक वापरती विहीर होती. या विहिरीचे सन २०१८ मध्ये शासनाच्या कृषी विभागाने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रवेश प्रेरक उपक्रमांतर्गत सदर विहिरीचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम केले होते. त्यापोटी शासनाने यंत्रणेला सुमारे पन्नास हजार रुपये खर्चापोटी अदा केले आहेत.
तसेच सदर विहिरीवरून गावातील आदिवासी व इतर समाजाचे लोक दैनंदिन वापरासाठी पाणी घेत होते. मात्र ग्रामपंचायतची परवानगी न घेता पोलिस पाटील यांनी सदरची विहीर हमशाही करुन बुजून टाकल्याने गावातील आदिवासी लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे.
अशी तक्रार मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली असून पोलिस पाटील यांनी विहीर बुजवून केलेल्या अतिक्रमणाची चौकशी होऊन पोलिस पाटील अनिल शिवाजी पाटील यांनी ग्रामपंचायत मालकीची विहीर बुजवून केलेले अतिक्रमण तातडीने काढून पोलिस पाटील यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांना पदावरुन बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे.
तसेच सोबतच एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत प्रवेश प्रेरक उपक्रमांतर्गत सदर विहिरीचे खोलीकरण व गाळ काढण्यासाठी केलेल्या कामाचे व झालेल्या खर्चाचे दस्ताऐवज कागदपत्रांच्या प्रती अधिक माहितीसाठी जोडलेल्या आहेत.
(गावातील ग्रामस्थांनी दिलेली माहिती.)
कोल्हे येथील पोलीस पाटील यांनी ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर अतिक्रमण केले आहे.हे खरे असलेतरी मात्र त्या जागेवर असलेली विहीर ही पोलीस पाटील यांनी बुजवलेली नसून, ही जुनी विहीर असल्याने अतिपावसामुळे ते खचली होती. त्यामुळे तिचा वापर बंद झाला होता. तसेच गावातील काही लोक या विहिरीत केरकचरा नेऊन टाकत होते. म्हणून या विहिरीत एखाद्या वेळेस या रस्त्यावरून जाणारे वाटसरू, लहान मुले किंवा गुरेढोरे पडण्याची शक्यता होती. व यातून जीवितहानी होण्याचा धोका होता. म्हणून ही विहीर गावातीलच काही सुज्ञ नागरिकांनी बुजवून टाकली होती. अशी माहिती समोर येत आहे.
(तसेच प्रत्यक्ष पोलिस पाटील यांना भेटून सत्य परिस्थिती जाणून घेतली जाणार आहे.)