खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासनचे स्टिकर, सर्वसामान्य व सुज्ञ नागरिकातून संभ्रम.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/११/२०२२
काही वाहन मालक आपण नोकरीत असलेल्या सरकारी खात्याचा लोगो खाजगी वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये लावतात. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होते. तसेच काही सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्याही गाड्यांवर लोगो असतात. वाहतूक पोलिसांच्या नियमानुसार भारतीय सेना, पोलिस, भारत सरकार, महाराष्ट्र शासनाचे लोगो लावण्यास परवानागरी नसल्याचे बोलले जाते मात्र काही वाहनधारक टोल चुकविण्यासाठी किंवा समाजात प्रतिष्ठा मिळवून घेण्यासाठी असे लोगो वापरत असलेतरी आजपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी व मोठ्या प्रमाणात असे लोगो वापरुन लुटीचा प्रयत्न, आम्ही अधिकारी आहोत असे भासवत वेगवेगळ्या चौकशीसाठी आलो आहोत असे सांगून चिरीमिरी घेऊन तोडी पाणी करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत व असे प्रकार आजही घडत आहेत. यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी व इतरांच्या नावाची बदनामी होते सोबतच शासनाच्या कामकाजाबाबत जनतेतून संभ्रम निर्माण होतो.
अश्याच प्रकारच्या एका खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन असे स्टिकर लावून हे वाहन जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरीत फिरत असल्यामुळे सर्वसामान्य जनता व सुज्ञ नागरिकांनी या वाहनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण हे वाहन शेंदुर्णी नगरीतील एक जबाबदार शासकीय अधिकारी यांच्या ताब्यात असले तरी या वाहनाचा मालक दुसराच असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या चारचाकी स्वयंचलित वाहनावर (महाराष्ट्र शासन) असे रेडीयम वापरुन स्टिकर लावण्यात आले आहे. मात्र हे चारचाकी वाहन शासकीय नसून सुध्दा या खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासनाचे स्टिकर लावण्यामागचा संबंधित शासकीय नोकरीत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा हेतू काय असावा असा प्रश्न उपस्थित केला जात असून संबंधित अधिकारी यांनी याबाबत खुलासा करावा किंवा आपल्या ताब्यात असलेल्या वाहनावरील लोगो काढून टाकावा म्हणजे जनतेतून निर्माण झालेले संभ्रम दूर होतील.
म्हणून संबंधित कायद्याच्या अखत्यारीत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी भारतीय सेना, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, असे लोगो असलेल्या वाहनांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. कारण अश्या खाजगी वाहनांवर लोगो वापरुन याचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतो अशी शंका व्यक्त केली आहे.