दिवाळीच्या सणाला अंबे वडगाव अंधारात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२१
हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी (दीपावली) हा सण म्हणजे खूपच महत्त्वाचा मानला जातो. तसाच साजराही केला जातो. या सणानिमित्त सगळीकडे साफसफाई, रंग, रंगोटी केली जाते. या महत्त्वाचे म्हणजे दिपपूजन केले जाते. गावात विद्यूतपूरवठा नव्हता त्या काळात घरातील दिवे, कंदिल, समई यांची साफसफाई करून दिपपूजन केले जात होते. तसेच दिवाळीच्या सणानिमित्त घरासमोर आकाश कंदील व ईतर सजावट करुन सर्व परिसरात झगमगाट केला जात असे.
परंतु आता गावागावात, घराघरात विद्यूतपूरवठा झाला असल्याने सगळीकडे झगमगाट पहावयास मिळतो व सणासुदीला सजावटीसाठी कोणतेही श्रम न घेता घरादारात, परिसरात लख्ख प्रकाश करता येतो. मात्र तरीही अंबे वडगाव ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे दिपावळीच्या सणालाही गावात अंधार होता.
यामागील कारण काय तर फक्त आणि फक्त विद्यूत खांबावरील उडालेले बल्ब (पथदिवे) काढून त्याजागी नवीन चांगले बल्ब लावण्यासाठी ग्रामपंचायतीचे आयोजन, नियोजन व वेळ नसल्याचे कारण समोर येत आहे.
अंबे वडगाव गावात एकूण ६५ च्या जवळपास विद्यूत पोल (खांब) असून पैकी फक्त १४ ते १५ विद्यूत पोल खांबावरील लाईट (पथदिवे) सुरु असल्याचे दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या सणासुदीला गाव अंधारात असल्याने ग्रामस्थ व महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
म्हणून गाव सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतातरी ग्रामपंचायतीने विद्युत खांबावरील बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.