भुयारी मार्गाकडे पाचोरा नगरपालिकेचे दुर्लक्ष, कॉंग्रेसचा आंदोलनाचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२१
पाचोरा शहरातील छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गात नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक वाहनधारक जखमी होत असून याकडे गंभीर बाबीकडे नगरपालिकेने त्वरित लक्ष न दिल्यास कॉंग्रेस तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉंग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी यांनी दिला आहे.
पावसाळ्यात पाऊस बंद झाल्यावर सालाबादाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गात पडलेल्या मातीचा चिखल होवुन तीला चिकटपणा येऊन मोटारसायकल स्वार धडाधड पडुन जखमी होत आहेत. जो पडला त्याला आजुबाजुला असलेले लोक मदत करुन अपघातग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल करत आहेत.
दररोज, दर तासाला अनेक दुचाकीस्वार लोक शेवाळयुक्त चिखलात गाडी घसरुन पडत आहेत. आज दिनांक ५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळ पासून अनेकजण पडले पैकी काहींना किरकोळ मुकामार लागला तर काहींना फॅक्चर झाले आहे. जखमीत सहीष्णा सोमवंशी, उन्नती अग्रवाल यांना मुकामार लागला होता. त्यांच्यावर श्रेयस हॉस्पिटल मध्ये डॉ. अंनत पाटील यांनी प्रथमोपचार केले. तसेच मेडीकल चालक पवन येवले यांचा हाथ फ्रॅक्चर झाला असुन त्यांच्या उजव्या हातावर जळगाव येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे अपघातांची मालिका सुरुच असून एखाद्यावेळेस मोठा अपघात होऊन जिवीतहानी होऊ शकते हा धोका लक्षात घेऊन कॉंग्रेसच पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी उपविभागीय अधिकारी श्री. बादल साहेब यांना भेटून निवेदन देत तात्काळ या गंभीर बाबी कडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गात दरवर्षी या भुयारी मार्गात अपघात होऊन लोक पडतात याचे कारण रस्त्याच्या कडेला बनवण्यात आलेल्या गटारी खोल नसल्याने पाणी वाहून न जाता ते पाणी रस्त्यावर येऊन कायमस्वरूपी चिखल होतो म्हणून अपघात होतात ही बाब लक्षात आणून देत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून गटारी खोल करण्याची मागणी केली होती. मात्र नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांनी थाथुरमातुर काम करुन सारवासारव केली होती.
विशेष म्हणजे थातुरमातुर कामे करुनही बिल मात्र मनमानी पध्दतीने काढली जातात असाही आरोप केला जात असून आतातरी अशी थातुरमातुर कामे न करता इंजिनिअर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ रस्त्याच्या दोघा बाजुने नवीन गटारी खोल करुन भुयारी मार्ग अपघात मुक्त करावा अशी मागणी पाचोरा शहरवासीयांनी केली आहे.
तसेच ही समस्या नगरपालिकेने येत्या आठवडाभरात सोडवून भुयारी मार्ग चिखलमुक्त न केल्यास आम्ही नाविलाजास्तव सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा श्री. सोमवंशी यांनी दिला आहे.
जनतेने निवडून दिल्यानंतर जर जनतेला पाहिजे त्या सुखसोयी वेळेवर मिळत नसतील तर येत्या निवडणुकीत जनता नक्कीच जाब विचारेल व त्याचे उत्तर मतपेटीतून देईल असेही मत काही पाचोरा वासियांनी व्यक्त केले आहे.