अवैधधंदे करणारांचे राजकारण्यांना साकडे, आम्हाला विकु द्या दारू व घेऊ द्या हो सट्याचे आकडे.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१०/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड गावात सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी दारुची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच राजरोसपणे सट्या (मटका) बेटिंगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून यांना राजाश्रय मिळत असल्याने अवैधधंदे करणारांची दादागिरी वाढतच चालली होती. याला वैतागून त्रस्त महिलावर्ग व सुज्ञ नागरिकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीसात तक्रारी वरुन व सत्यजीत न्यूजकडे कैफियत मांडली होती. म्हणून या अवैधधंद्याचे विरोधात सत्यजीत न्यूज कडून मागील पंधरा दिवसापासून वारंवार वृत्त प्रकाशित केले होते.
याची दखल घेत पाचोरा डी. वाय. एस. पी. भरतजी काकडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णाजी भोये साहेबांनी सतत धाडसत्र राबवून अवैध धंदे वाल्यांना सळो कि पळो करून सोडले असून महिलावर्ग व सुज्ञ नागरिकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे आभार मानले असून हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
परंतु अवैधंद्याची चटक लागलेले ऐतखाऊ व्यवसायिक या कारणास्तव बेचैन झाले आहेत. राजरोसपणे अवैधधंदे सुरु असतांना अवैधधंद्याचे स्पर्धेत अवैधधंदे करणारांचे गट,तट पडून वादविवाद होत होते. यातून दोन सट्टा किंग मध्ये हाणामारी ही झाली होती. परंतु पिंपळगाव पोलिसांच्या बेधडक कारवाईत यांना पळताभुई थोडी झाल्याने सगळ्या अवैधधंदे करणारांनी आता एकजूट होऊन (आम्ही दोघे भाऊ,भाऊ सगळे मिळून एकत्र खाऊ) असा पावित्रा घेत अवैधधंदे पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
यात या अवैधधंदे करणारांनी काही व्यक्तीच्या माध्यमातून पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व काही कर्मचाऱ्यांना भेटून हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची तेथे डाळ न शिजल्यावर चोरासारखे परत फिरावे लागले असल्याचे खात्रीपूर्वक समजले आहे.
म्हणून आता या अवैधधंदे करणारांनी आपले अवैधधंदे पुन्हा सुरु करण्यासाठी पाचोरा व जामनेर तालुक्यातील सत्ताधारी व विरोधी राजकारण्यांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली असून आज हे अवैधधंदे करणारे पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील प्रथम नागरिकांना भेटून साकडे घालणार असल्याचे जनमानसात चर्चिले जाते आहे.
म्हणून आता हे अवैधधंदे पुन्हा सुरु झाल्यास नक्कीच या अवैधधंदे करणारांना राजाश्रय मिळत असल्याचा जनतेतून केला जाणारा आरोप निश्चितच खरा ठरेल व भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत कुऱ्हाड गावातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही हे मात्र खरे.
(पोलिसांनी कोणाच्याही व कोणत्याही दबावाखाली येऊ नये अशी विनंती कुऱ्हाड गावातील जनतेने केली असून आमच्या गावातील अवैधधंदे कायमस्वरूपी बंद झाल्यास आम्ही संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करू असे ग्रामस्थांनी सांगितले.)