मीठाण्यात नाही मीठ, घरधनी असतो फीट. संसाराचा गाडा ओढतांना महिलांची फरफट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०४/२०२१
आज संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीच्या भिषण सावटाखाली असतांनाच या संकटातून बाहेर निघण्यासाठी शासन, प्रशासन, यात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस प्रशासन व इतर सर्व यंत्रणा जिवाची पर्वा न करता झटत असतांनाच.
दुसरिकडे जनजीवन विस्कळीत होऊ नये गोरगरिबांना घरात अन्नधान्य पुरेसे असावे म्हणून शासनाने स्वस्त धान्य दुकानातून धान्याची व्यवस्थाही केली आहे.
परंतु दुसरिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस रात्रंदिवस झटत असतांना याचाच फायदा घेत अवैधधंद्यांनी डोके वर काढले असून जळगाव जिल्ह्यात सर्वदूर सट्टा, पत्ता, जुगार हे अवैधधंद्ये गावागावात, वाड्यावस्त्यावर रात्रंदिवस खुलेआम सुरु आहेत. विशेष करुन गावठी, इंग्लिश तसेच देशीदारुची गल्लीबोळात दिवसाढवळ्या खुलेआम विक्री सुरु आहे. या प्रकारामुळे शासन फुटक्या घड्यात पाणी भरत असल्याचे दिसून येत.
तसेच कोरोनाची लागण झाल्यापासून सततच्या लॉकडाऊनमध्ये शहरातील छोटेमोठे कारखाने, जीवनावश्यक असलेली दुकाने वगळता सर्वच व्यवसाय ठप्प झाले असल्याने विशेष म्हणजे बांधकाम व्यवसाय बंद असल्याने कष्टकरी मजूर घरीच बसून आहेत.
कारण जळगाव जिल्ह्यातील शेती व्यवसायाची परिस्थिती पाहिल्यावर जास्तीत जास्त कोरडवाहू शेती असल्याने व आता उन्हाळा असल्याने शेतात काहीच कामे नाहीत. तसेच आता शेती मशागतीची कामे सुरु आहेत. परंतु आता हि कामे करतांना स्वयंचलित मशनरीच्या साह्याने वखरटी, नांगरटी, विहीर खोदकाम, गाळ काढणे ही कामे करणारे मजूर हातावर हात ठेवून आहेत.
ग्रामीण भागातील शेत मजुर व सर्वसामान्य परिवारातील घटक कठीण परिस्थितीचा सामना करत असतांनाच दुसरिकडे जळगाव जिल्ह्यातील गावागावात, खेड्यापाड्यात, वाडावस्तीवर अवैधधंद्यांचा सुळसुळाट झाला असल्याने बऱ्याचसे लोक या सट्टा, पत्ता, जुगार व दारुच्या आहारी गेल्याने व हाताला काम नसल्याने व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपूर्तीसाठी घरातील धान्य, भांडीकुंडी, बकऱ्या, गायी, म्हशी, बैल, शेती उपयोगी साहित्य तसेच घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिनेच काय मायमाऊलीच्या गळ्यातील सौभाग्याच लेण असलेले मंगळसूत्र विकून त्या पैश्यांची सट्टा, पत्ता, जुगार व दारुच्या गुत्त्यावर उधळ करत आहेत.
या कारणांमुळे ज्या घरातील लोक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. अश्या ग्रामीण भागातील महिला आपला संसाराचा गाडा ओढतांना मेटाकुटीला आल्या आहेत. एका बाजूला घरातील लहानस मुल दुधाच्या एका घोटासाठी रडत असतांना, घरात भाजीला फोडणी देण्यासाठी तेल नसतांना, फाटक्या पदरात आपली पत सांभाळून संसाराचा गाडा ओढणाऱ्या महिलांना एकवेळ उपाशीपोटी राहून चिल्यापिल्यांना दोन घस खाऊ घालून दिवस काढावे लागत आहेत.
म्हणून आतातरी जनसेवेचा वसा हाती घेतलेले पदाधिकारी, जनसेवक, समाजसुधारक यांनी पुढाकार घेऊन जळगाव जिल्ह्यातील अवैधधंद्यांचा नायनाट करावा अशी मागणी सुज्ञनागरीक व महिला वर्गाकडून होत आहे.
पुढील बातमी = घरपोच दारुचा निर्णय समाजहितासाठी घातक.