कुऱ्हाड येथील गावठीदारु विक्रेत्यांवर पिंपळगाव पोलिसांची कारवाई.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत लोहारा दुरक्षेत्र पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हाड गावात गावठी दारु निर्मिती व भरवस्तीत तसेच हमरस्त्यावर, देवालयाजवळ रात्रंदिवस खुलेआम गावठीदारुची विक्री सुरु असते व आजही मोठ्या प्रमाणात गावठीदारुची निर्मिती व विक्री सुरु असून पंचक्रोशीतील गावागावातील दारु विक्रेते कुऱ्हाड येथूनच गावठीदारुचे पाच ते दहा, दहा लिटरचे कॅन भरून नेतात व गावागावात विक्री करतात म्हणजेच कुऱ्हाड येथील गावठीदारुची निर्मिती व विक्री हि आसपासच्या दहा खेड्यातील लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
(विशेष म्हणजे लॉकडाऊच्या कालावधीत सर्वदूर मान्यताप्राप्त दारु दुकाने बंद रहात असले तरी कुऱ्हाड गावात बिनबोभाट दारु विक्री सुरु असते यामुळे आसपासच्या गावचे दारुडे कुऱ्हाड गावात दारुड्यांची यात्राच भरते व सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडत असतो. )
याचीच दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांनी पो.हे.कॉ.रणजित पाटील, पो.कॉ.अरुण पाटील, ज्ञानेश्वर बोडखे, दिपकसिंग पाटील, उज्ज्वल जाधव, मुकेश लोकरे या सहकाऱ्यांना सोबत घेत कुऱ्हाड येथील देशीदारु गावठीदारु विक्रेता संतोष महादु तिरमल याच्या घरी धाड टाकून ३६४/०० रुपये रोख व १४ नाईंटी मापाच्या टँगो पंच बाटल्या मिळुन आल्याने पो.कॉ. मुकेश पांडुरंग लोकरे यांच्या फिर्यादीवरून ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचवेळी बाळु शंकर देशमुख राहाणार कुऱ्हाड याच्याकडे १७ देशीदारुच्या १७ बाटल्या आढळून आल्याने फिर्यादी पो.कॉ.उज्ज्वल जाधव यांच्या फिर्यादीवरून ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
तसेच आरोपी खंडु सदाशिव माळी कुऱ्हाड याच्या कडे २२ बाटल्या आढळून आल्याने फिर्यादी ना.पो.कॉ. अरुण सुभाष राजपूत यांच्या फिर्यादीवरून ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई करत असतांनाच कुऱ्हाड गावात सट्टा बेटींग सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन आरोपी रघुनाथ रामदास मिस्तरी यांच्याकडे धाड टाकली असता त्याठिकाणी ३६०/०० रुपये रोख व सट्टा जुगाराची साधने मिळुन आल्याने फिर्यादी पो.कॉ.सचिन चिंधा वाघ यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुध्द १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाई बाबतीत कुऱ्हाड परिसरातील जनतेकडून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे आभार मानले असून अवैधधंदे विरोधात कारवाया सातत्याने होऊन हे कायमस्वरूपी अवैधधंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी जोर धरत आहे.
परंतु एका बाजूला पोलिस अवैधधंदे करणारांच्या विरोधात सतत कारवाई करत असतात परंतु कायद्यातील पळवाटा असल्याने हे अवैधधंदे करणारे लगेचच सुटतात व पुन्हा नवीन जोमाने पुन्हा अवैधधंदे सुरु करतात असे दिसून येते. या कारणांमुळे कायदा जिवंत आहे की नाही, सतत कारवाया होऊनही हे अवैधधंदे करणारे पुन्हा, पुन्हा तेच अवैधधंदे करतात मग यांच्या पाठिमागे कोणती शक्ती आहे. हे कुणाच्या भरवश्यावर हे धंदे करतात, सतत कारवाई होतांना त्यांना जामीन होणारासह अवैधधंदे करणारांवर हद्दपारीची कारवाई का करण्यात येत नाही ? असे एक ना अनेक प्रश्न सुज्ञनागरिकांनी व महिलांनी उपस्थितीत करत कुऱ्हाड गावातील अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करुन गोरगरिबांचे उध्वस्त होणारे संसार वाचवावेत अशी मागणी केली आहे.