कुटुंब बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत कुऱ्हाड येथे तीन लाख रोख रुपये रकमेची चोरी.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~३१/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील महादेव मंदिरामागील प्लॉट भागातील रहिवासी राजू सुरेश क्षीरसागर हे साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त सहकुटुंब गेलेले असतांना दिनांक ३० गुरुवार रात्री ते ३१ डिसेंबर सकाळपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी डाव साधून तीन लाख रुपये रोख रकमेची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की राजू क्षीरसागर हे सहकुटुंब बाहेरगावी गेलेले असतांनाही शेजारच्या लोकांना राजू शिरसाट यांचे घराचा दरवाजा सकाळी उघडा दिसल्याने ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात आली, याच वेळी राजू क्षीरसागर याला फोन वर घटना कळवली. लगेचच राजु हा बाहेर गावहुन परत आला व घरातील वस्तूंची व घरात ठेवलेले पैसे ठेवल्याजागी आहेत का नाही याची पहाणी केली. मात्र घरात ठेवलेले तीन लाख रुपये आढळून न आल्याने पैसे चोरी गेल्याचे लक्षात येताच राजू याने तोंड ठोकत रडायला सुरुवात केली हे पाहून पत्नीनेही आक्रोश सुरु केला.
कारण राजू व त्याच्या पत्नीने मुलाबाळांसह रात्रंदिवस शेतात राब, राब राबून रक्ताचे पाणी करत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करुन पिकवलेला कापूस विकून मिळालेले पैसे घरात ठेवले होते. याच आलेल्या पैशातून घर खरेदी करण्याचे स्वप्न राजू पहात होता. व दोन दिवसांनी घर खरेदी करायचे होते म्हणून पैसे घरात ठेवले होते. परंतु चोरट्यांनी ऐनवेळी डाव साधल्याने क्षीरसागर कुटुंबीयांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. हा आघात सहन न झाल्याने शिरसागर कुटुंब घटना माहित झाल्यापासून अन्न, पाणी विसरुन धाय कोलमडून रडत आहे.
सदर चोरीची घटना पिंपळगाव पोलीस स्टेशनला कळवली असता सहायक पोलिस निरीक्षक मा.श्री.कृष्णा भोये साहेब, चालक सचिन वाघ व सहकारी पोलीस प्रवीण देशमुख, शैलेश चव्हाण हे तात्काळ हजर होत घटनेची माहिती जाणून घेतली.
(चोरीच्या घटनेची संशयाची सुई गावातच)
चोरी झालेल्या घरात, ज्या ठिकाणी पैसे, ज्वारी भरून ठेवलेल्या पत्राच्या टाकीत ठेवलेले होते याच ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला. मात्र याच टाकीत सोन्या, चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून न नेता ते सुरक्षित होते. तसेच चोरट्यांनी घरात कोठेही शोधाशोध न करता सरळसरळ रोख रक्कमेची चोरी केली असल्याने ही चोरी गावातीलच एखाद्या जवळच्या किंवा राजू क्षीरसागर यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन व्यवहाराची माहिती असलेल्यानी केली असावी असा अंदाज
सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. कृष्णा भोये यांनी व्यक्त केला असून चोरटे हे गावातीलच असतील व ते लवकर जेरबंद होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच काही संशयितांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेऊन चौकशी सुरु आहे.