ई पॉश मशीन अभावी कळमसरा येथील गावकरी, ऐन दिवाळीच्या तोंडावर आनंदाच्या शिध्या पासून वंचित

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२३

सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यात रेशनिंग वितरणाचा मोठ्या प्रमाणात घोळ सुरु असून या वितरण व्यवस्थेकडे पुरवठा विभाग व संबंधित जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने ज्यांना खरच दोन घास मिळावेत म्हणून शासनाने त्यांना शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मोफत व अत्यल्प किंमतीत धान्य उपलब्ध करुन दिले आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदार वेळेवर धान्य पुरवठा करत नसल्याने गोरगरिबांचे पोट पाठीला भिडले आहे तर दुसरीकडे याच गोरगरिबांच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या धान्य दुकानदारांच्या व या काळ्या बाजाराला खतपाणी घालणाऱ्या सगळेच नव्हे तर (काही) भ्रष्ट जबाबदार अधिकाऱ्यांच्या पोटाचा घेर दिवसेंदिवस वाढत चालला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावात सुरु असून या कळमसरा गावात ऐन सणासुदीच्या काळातसुद्धा गोरगरिबांना आंनदाचा सिधा मिळाला नसल्याची बाब समोर येत आहे. तसेच इतर महिन्यातही वेळेवर व पुरेपूर धान्य वाटप केले जात नसल्याच्या तक्रारी पुरवठा विभाग पाचोरा व प्रसारमाध्यमांकडे येत असल्याने कळमसरा गावासह पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी होऊन गोरगरीब जनतेला वेळेवर व पुरेपूर धान्य वाटप कसे केले जाईल याकरिता योग्य ती अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

याबाबत कळमसरा गावातील सत्य परिस्थिती जाणून घेतली असता कळमसरा गावासाठी श्रीराम सहकारी दुध उत्पादक सोसायटी व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून रेशन दुकानातून स्वस्त धान्य वाटप केले जाते. या दोघेही संस्थांकडे ३७५, ३७५ रेशनकार्ड धारक आहेत. परंतु या सर्व रेशनकार्ड धारकांना वेळेवर धान्य वाटप केले जात नसल्याने दिपावलीच्या सणानिमित्त मिळणाऱ्या आनंदाच्या शिध्या पासून वंचित रहावे लागल्याने कळमसरा ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच कळमसरा गावातील रेशनिंग दुकानदारांना देण्यात आलेले ई पॉश मशीन एप्रिल २०२३ पासून खराब झाले आहेत. हे ई पॉश मशीन खराब झाल्यापासून श्रीराम सहकारी दुध उत्पादक सोसायटी व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालकांनी नवीन ई पॉश मशीन मिळवण्यासाठी पाचोरा पुरवठा विभागाकडे वारंवार मागणी केली आहे. परंतु आज नोव्हेंबर महिना उलटला तरीही पुरवठा विभागाकडून अद्यापपर्यंत नवीन ई पॉश मशीन देण्यात आले नसल्याने कळमसरा येथील दोघेही संस्था ह्या इतर गावांतील धान्य वाटप केल्यावर इतर गावातून ई पॉश मशीन आणून धान्य वाटप करत असल्याने कळमसरा ग्रामस्थांना वेळेवर धान्य वाटप केले जात नाही.

असाच काहीसा प्रकार संपूर्ण पाचोरा तालुक्यातील गावागावातून सुरु असून याच संधीचा फायदा घेत काही रेशनिंग दुकानदार ई पॉश मशीनचा सहारा घेत किंवा मुद्दामहून तांत्रिक बिघाड करुन किंवा मशीन खराब झाले आहे असा बनाव करुन मनमानीपणे सवडीनुसार धान्य वाटप करतात व हे धान्य वाटप करतांना लाभार्थ्यांना पुरेपूर धान्य देत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत तरी सुद्धा वरीष्ठ अधिकारी या सगळ्या सुरु असलेल्या सावळ्या गोंधळाची दखल घेऊन चौकशी व कारवाई का करत नाही अशी शंका सुज्ञ नागरिक व सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.

(पाचोरा तालुक्यातील बरीचशी रेशनिंग दुकाने ही कागदोपत्री बचतगटाच्या व काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नावाने घेतली गेली आहेत. मात्र प्रत्यक्षात ही दुकाने संबंधित बचतगट किंवा संबंधित संस्था चालवत नसून ही दुकाने काही भांडवलदारांच्या घशात अडकली आहेत. हे भांडवलदार संबंधित बचतगट व संस्थांना दरमहा ठराविक रक्कम देऊन ही दुकाने चालवून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन अमाप पैसा कमावत आहेत. म्हणून जर आपल्या गावातही असाच सावळा गोंधळ सुरु असेल तर आपण नक्कीच या. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करुन एक प्रत सत्यजित न्यूज कडे पाठवा नक्कीच आवाज उठवला जाईल.)

ब्रेकिंग बातम्या