लोहारी येथील सैन्यदलात सेवा बजावणाऱ्या सैनिकांची, गाव वाचवण्यासाठी धडपड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०९/२०२३
सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील गाव, खेड्यात सगळीकडे सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी दारुची अवैध विक्री हे अवैध धंदे राजरोसपणे, दिवसाढवळ्या बिनदिक्कतपणे सुरु असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या अवैध धंद्यामुळे गाव, खेड्यात अशांतता पसरली असून भांडणतंटे, मारामाऱ्या, घराघरात गृहकलह, यातुनच महिलांना मारझोड, तसेच व्यसनाधीन लोक व्यसनपूर्तीसाठी घर, संसारातील लागणाऱ्या वस्तूंची विक्री, खाजगी सावकाराकडून कर्ज काढून एवढ्यावरच नाही भागले तर महिलांच्या अंगावरील दाग, दागिने मोडून आटली व्यसनपूर्ती करत आहेत. यामुळे आजच्या परिस्थितीत व्यसनाधीन लोकांच्या घरातील जवळपास पन्नास टक्के माय, माऊलींच्या गळ्यात सौभाग्याच लेण असलेले मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवून व्यसनाधीन लोक व्यसनपूर्ती करत असल्याचे चित्र दिसून येते आहे.
या अवैध धंद्यांबाबत गावागावातून वारंवार आवाज उठवला तरीही हे अवैध धंदे बंद होण्याऐवजी वाढतच चालले असल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. यामुळे घराघरात भांडणतंटे, मारामाऱ्या होऊन यातुनच आत्महत्या, घटस्फोट, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे गावातील पदाधिकारी व पोलीस पाटील या अवैध धंद्यांकडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याने तर काही ठिकाणी अर्थपूर्ण लागेबांधे असल्याने अवैध धंदे करणारांची दादागिरी वाढली असून गाव कुसातील मंदिरे, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालय, बसस्थानक, गाव चावडीवर या अवैध धंदे करणारांनी आपली दुकाने थाटली आहेत.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील लोहारी गावात सुरु असून या लोहारी गावातील भरवस्तीत, अंगणवाडीच्या इमारतीजवळ, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, मंदिर परिसरात व बसस्थानक परिसरात सट्टा, पत्ता, जुगार व गावठी दारुची निर्मिती व विक्री तसेच देशी दारुची विक्री करणारांनी आपली अवैध धंद्यांची दुकाने थाटली आहेत. विशेष म्हणजे हे अवैध धंदे राजरोसपणे दिवसाढवळ्या बिनदिक्कतपणे सुरु असून पानटपरी व इतर ठिकाणी सट्टा बेटिंगचा व्यवसाय करणारांनी कल्याण, मुंबई, वरळी मटका असे मोठमोठे फलक लावून त्या फलकावर ओपन, क्लोज अशा चौकटीत अंक लिहिलेले बघायला मिळत आहेत. यामुळे लोहारी गावातील ही परिस्थिती पाहता या अवैध धंद्यामुळे गावातील अल्पवयीन व तरुण मुलांसह लहानथोर मंडळी व्यसनाच्या आहारी जात आहे.
ही परिस्थिती पाहून लोहारी येथील देशसेवेसाठी भारतीय सैन्यात सेवा करत असलेले गणेश भास्कर मगर व शाम भास्कर मगर या दोघ भावांनी आपणही या गावाचे काही देणे लागतो ही भावना उराशी बाळगून लोहारी गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले होते. या निवेदनाची दाखल घेऊन लोहारी ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला ग्रामपंचायतीमार्फत लोहारी गावातील सट्टा, पत्ता, जुगार व अवैध रीत्या सुरु असलेली देशी व गावठी दारुची निर्मिती व विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ठराव दिला आहे. परंतु आजपर्यंत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने गणेश भास्कर मगर व शाम भास्कर मगर यांनी सत्यजित न्यूज कडे खंत व्यक्त करत लोहारी गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी गावातील महिला व सुज्ञ नागरिकांच्या सहकार्याने लवकरच आंदोलन छेडण्याच्या इशारा दिला आहे. हे चित्र पाहिल्यावर नक्कीच जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नसल्याने अवैध धंद्यात जळगाव जिल्ह्याने उच्चांक गाठला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.