डी. वाय. एस. पी. धनंजय वेरुळे यांच्या सतर्कतेने, नांद्रा ते हडसन रस्त्यावरील अपघातग्रस्त कुटुंबाचे वाचले प्राण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०६/२०२३
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध असतात. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे पाचोरा येथे कार्यरत असलेले डी. वाय. एस. पी. मा. श्री. धनंजय वेरुळे साहेब व पोलीस कॉन्स्टेबल मा. श्री. राहुल बेहेरे यांनी रात्रीच्या वेळी एका अपघातग्रस्त कुटुंबाला मदत करुन त्यांना जीवदान दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की डी. वाय. एस. पी. मा. श्री. धनंजय वेरूळ साहेब हे दिनांक २७ जून २०२३ मंगळवार रोजी मा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जळगाव येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बंदोबस्त कामी गेले होते. बंदोबस्त आटोपल्यावर रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास पाचोरा येथे परत येत असतांना त्यांना नांद्रा ते हडसन रस्त्यावर एक तरुण, एक महिला व एक लहानसे चिमुकले बाळ अपघात होऊन रस्त्यावर पडलेले दिसून आल्याचे दिसून येताच त्यांनी गाडी चालक पंकज मोरे यांना सांगून त्यांनी लगेचच गाडी थांबवली व मा. श्री. धनंजय वेरुळे साहेब पोलीस कॉन्स्टेबल अजितसिंग राजपूत व चालक पंकज मोरे यांनी गाडीतून खाली उतरुन अपघातग्रस्तांना आधार देत पोलीस गाडीत आणून त्वरित पाचोरा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. व त्वरित डॉक्टरांना बोलावून घेत तातडीने उपचार सुरु केले.
***************************************************
यावेळी अपघातग्रस्तांना गाडीत टाकल्यावर मा. श्री. धनंजय वेरुळे साहेबांनी अपघातस्थळी थांबून घेत अपघातग्रस्तांच्या काही वस्तू पडल्या आहेत का हे बघितले व लगेचच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल मा. राहुल बेहेरे यांना भ्रमणध्वनीवर अपघात झाल्याचे ठिकाण बोलावून घेतले त्यांच्या दुचाकीवरुन पाचोरा येथे आले.
****************************************************
ही घटना माहीत पडताच सत्यजित न्यूज प्रतिनिधींनी दवाखान्यात जाऊन अपघाग्रस्थाची भेट घेऊन विचारपूस करत सविस्तर माहिती जाणून घेतली असता पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील दिनेश रामदास वाके, सौ. आशाबाई रामदास वाके हे एका बाळासह रात्री आठ ते सव्वा आठ वाजेच्या सुमारास घराकडे जात असतांना नांंद्रा ते हडसन दरम्यान रस्त्यावर त्यांच्या मोटारसायकल समोर अचानकपणे निल गाय (रोही) आडवा आल्यामुळे त्याला वाढवण्याच्या प्रयत्नात गाडी स्लिप होऊन अपघात झाल्याचे सांगितले.
आमचा अपघात झाल्यावर आम्ही घाबरुन गेलो होतो आम्हाला व आमच्या बाळाला मार लागला होता. यामुळे आम्हाला उठता, बसता येत नव्हते रात्रीची वेळ असल्याने आता आपले काय होईल या विचारात देवाचा धावा करत असतांनाच आमच्याजवळ एकदम गाडी येऊन थांबली. गाडीकडे पाहिल्यावर ही पोलीस गाडी आहे हे लक्षात येताच आमचा जीव भांड्यात पडला. लगेचच एक अधिकारी व दोन पोलीस बांधवांनी आम्हाला गाडीत टाकून पाचोरा येथे आणले यावेळी गाडीत बसण्याजोगी जागा नसल्याने मा. श्री. धनंजय वेरुळे साहेब अपघातस्थळी थांबले हे विशेष होय. आमचा अपघात होऊन काही मिनिटे झाली होती आमच नशिब बलवत्तर होत म्हणून देव रुपाने पाचोरा पोलीस धाऊन आले व आम्हाला जीवदान दिले जर पोलीस यायला थोडा उशीर झाला असता तर नक्कीच रस्त्यावरुन भरधाव येणाऱ्या एखाद्या वाहनाखाली आम्ही चिरडले गेलो असतो अशी भिती व्यक्त केली.
तसेच आमची जेव्हा दवाखान्यातून सुट्टी होईल तेव्हा आम्ही थेट घरी न जाता आम्ही अगोदर डी. वाय. एस. पी. मा. श्री. धनंजय वेरुळे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहेरे दादा, पोलीस कॉन्स्टेबल अजितसिंग राजपूत दादा व पंकज मोरे दादा यांची भेट घेऊन आभार मानणार आहोत कारण त्यांनी एकप्रकारे आम्हाला पुनर्जन्मच दिला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही असे मत दिनेश वाके व सौ. आशाबाई वाके यांनी व्यक्त केले.