कुऱ्हाड खुर्द येथील आठवडी बाजारात शासनाने बंदी घातलेल्या (सिंगल यूज) कॅरी बॅगचा सर्रास वापर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०७/२०२१
म. सचिव सो. महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांचेकडील परिपत्रक महाराष्ट्रत प्लॅस्टीक व थर्माकोल अविघटनशिल वस्तूंदचे (उत्पािदन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचना २०१८ नूसार प्लॅस्टीक कॅरी बॅग, नॉन ओव्हरन पिशव्याव, वापरास बंदी घातलेली आहे. त्याच प्रमाणे शासनाच्या “माझी वसुंधरा” अभियानातील विविध उपायाअंतर्गत शहरातील व खेड्यापाड्यातील विविध ठिकाणी वापरात असलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांची (सिंगल युज) विक्री करणा-या व वापरणाऱ्या दुकानांवर जप्तीची धडक मोहिम राबविण्यांत यावी असे सक्त आदेश काढण्यात आले आहेत.
परंतु तरीही बऱ्याचशा महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतीने या आदेशाकडे कमालीचे दुर्लक्ष केले असल्यामुळे अजूनही (सिंगल यूज) वापराच्या कॅरी बॅग, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरुच असल्याचे दिसून येत आहे. यामागील कारण म्हणजे कॅरी बॅग बंदिचा आदेश निघाल्यावर काही महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद व ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात आली परंतु काहींनी फक्त नव्याचे नव दिवस याप्रमाणे कारवाई करुन आपली पाठ थोपटून घेतली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण हा कायदा अमलात आणतांना खेड्यापाड्यात सपसेल दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे दिसून येत असल्याने खेड्यापाड्यात अजूनही बंदी घालण्यात आलेल्या कॅरी बॅगा सर्रास वापर होत आहे.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे सुरु असल्याने कायदा पाळणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केला असून आजचे युग कायदा पाळणारांनाच कायद्याचा धाक दाखवते व कायदे धाब्यावर बसवून वागणारे दिवसाढवळ्या कायद्याचे उल्लंघन करतात तरीही त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे बुधवार रोजी आठवडी बाजार भरतो या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, शेव, मुरमुरे व इतर खाद्यपदार्थ विक्रेते यांनी शासनाच्या आदेशानुसार कॅरी बॅग (सिंगल यूज) प्लॅस्टिक पिशव्या वापरणे बंद केले आहे. या कॅरी बॅग वापरणे बंद केल्याने या व्यवसायीकांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत असून त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊन मालाची विक्री व खप कमी झाला असल्याचे व्यवसायीक सांगतात परंतु आम्हाला होणारा त्रास हा तात्पुरता असून ग्राहकांना हळूहळू सवय लागत असून बरेचसे ग्राहक आता कापडी पिशव्या वापरु लागल्याने थोड्याच दिवसात बाजारपेठेतून कॅरी बॅग हद्दपार होईल असा विश्वास व्यवसायीकांनी व्यक्त केला आहे.
परंतु एकाबाजूला कायदा पाळणारे सुज्ञ नागरिकांनी कॅरी बॅग वापरणे बंद केले असले तरी दुसरीकडे कायदा पाळणाऱ्या लोकांच्या व अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मटन, मासे व मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गावठी दारुचा व्यवसाय करणारे व्यवसायीक बिनधास्तपणे शासनाने बंदी घातलेल्या (सिंगल यूज) प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगचा सर्रासपणे वापर करत असल्याने शासनाच्या नॉन ओव्हरन (सिंगल यूज) वापराच्या कॅरी बॅग बंदीसाठी केलेल्या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे दिसून येते असल्याने सुज्ञ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत या कॅरी बॅग वापरणाऱ्या व्यवसायीकांवर व ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.