दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१२/२०२३

शासनाने महामंडळाच्या एस. टी. बसेस मधुन प्रवास करणारे जेष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना दिलेल्या भाडे सवलतीमुळे सर्व प्रवासी एस. टी. ने प्रवास करत असल्याचे दिसून येत असून या प्रवाशांनी काली पिली टॅक्सी कडे पाठ फिरवली असल्याने आजच्या परिस्थितीत या काली पिली टॅक्सीचे मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला एस. टी. ला सुगीचे दिवस आले असले तरी दुसरीकडे मात्र काळी पिवळी थोडक्यात सांगायचे झाल्यास काली पिली टॅक्सी मालक व चालकांच्या व्यवसायावर गदा आली असल्याचे दिसून येते.

आजच्या परिस्थितीत चांगले शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्याने बऱ्याचशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी मरणाला रात्र आडवी करण्यासाठी व आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी बॅंकेतून लाखो रुपये कर्ज घेऊन तसेच प्रवासी वाहतुकीसाठी परवाना काढण्यासाठी शासनाच्या नियमानुसार टॅक्स भरले आहेत. परंतु एस. टी. तुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी शासनाने सवलती जाहीर केल्यापासून या काली पिली टॅक्सी मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे दिसून येत असून यांच्या घरची परिस्थिती डबघाईस आल्यामुळे मुलाबाळांचे शिक्षण, घरातील सदस्यांची देखभाल, म्हाताऱ्या आईवडीलांचा दवाखाना, औषधोपचार करणे, किराणा, गाडीमध्ये लागणारे इंधन, दुरुस्तीसाठीचा खर्च करणे मुश्कील झाले आहे.

डोक्यावर कर्जाचा बोजा असल्याकारणाने कर्जदारांना वेळेवर पैसे परत केले जात नसल्याने एका बाजूला त्यांचा तगादा तर दुसरीकडे काली पिली टॅक्सी विकुन कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न केले तर काली पिली टॅक्सीच्या व्यवसायाला चांगले दिवस नसल्याने या टॅक्सी भंगारवाल्यांशिवाय कोणी विकत घेणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काली पिली टॅक्सीचे मालक व चालक मेटाकुटीला आले असून मरणाला रात्र आडवी करण्यासाठी आहे त्या परिस्थितीत आपला प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करत असून शासनाने आम्हाला मदत करावी अन्यथा आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

********************************************************
काली पिली टॅक्सी मालक व चालकांचा शासनाला प्रश्न ?
********************************************************
आम्ही शासनाच्या नियमानुसार रीतसर परवानगी घेऊन कर भरुन प्रवासी वाहतूक करत असतो असे असतांनाही कधीतरी चुकून किंवा अत्यावश्यक असते तेव्हा एक, दोन प्रवासी जास्त बसवले तर लगेचच कारवाई केली जाते तसेच वाहनांमध्ये थोड्याफार त्रुटी आढळल्यास राज परिवहन महामंडळाच्या माध्यमातून लगेचच कारवाई करण्यात येते मात्र आता एस‌. टी. प्रवासासाठी सवलती दिल्यापासून एस. टी. तुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची वाढली आहे. यामुळे एस. टी. बसेस मध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात प्रवासी भरुन गुराढोरांसारखी वाहतूक केली जात आहे. या बाबीकडे शासन, प्रशासन कानाडोळा करत आहे. तसेच आज या परिस्थितीत पाहिले असता एस. टी. महामंडळाच्या बसेस जुन्या झाल्या असून त्या प्रवासी वाहतूक करण्यासाठी योग्य नाहीत. परंतु या सगळ्या बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात असून यातून एखाद्या वेळेस मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत काली पिली टॅक्सी मालक व चालकांनी तसेच सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.