फादर्स डे निमित्त निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यांसह मान्यवरांचा सत्कार, डॉ. कलाम पुस्तक भिशीचा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम.
कु. चेतना हिरे.(वरखेडी)
दिनांक~२५/०६/२०२३
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे “फादर्स डे” च्या दिनानिमित्ताने प्राथमिक शिक्षकातील साहित्यिक व उपक्रमशील शिक्षकांचे संघटन करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांच्या हातून शैक्षणिक व समाजाभिमुख उपक्रम राबवून कृतीशील शिक्षकांना सतत प्रोत्साहन देणारे निवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. श्री. निळकंठराव गायकवाड यांचा शिक्षण उपसंचालक तथा प्रसिद्ध साहित्यिक मा. श्री. शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते शशिकांत हिंगोणेकर यांनी लिहिलेला “युद्ध सुरु आहे” हा काव्यसंग्रह, शाल, श्रीफळ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या सुरवातीला सुकन्या माई तथा सुषमा गायकवाड यांनी पिताश्री गायकवाड आप्पा व सत्कारमूर्ती निवृत्त प्राथमिक शिक्षण उपसंचालक तथा प्रसिद्ध साहित्यिक मा. श्री. शशिकांत हिंगोणेकर यांना कुंकूम तिलक व औक्षण करुन पेढा भरवून जन्मदाते वडील व साहित्यिक मा. श्री. हिंगोणेकर यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो अशी निर्मिकाला प्रार्थना करत चरणस्पर्श करत साष्टांग नमस्कार करुन त्याचे शुभाशीर्वाद घेतले. याप्रसंगी ग्रेडेड मुख्याध्यापक तथा ह.भ.प.मनोहर खोंडे व राजकुमार गवळी, विजय लुल्हे, चित्रकार सुनील दाभाडे उपस्थित होते.
निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांचा शाल, श्रीफळ देऊन विजय लुल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ह. भ. प. मनोहर खोंडे यांनी नेतकर साहेबांना भेटवस्तू दिली.
***********************
*विजय लुल्हे यांचा संकल्प*
पुज्य पिताश्री निवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक सुपडू नथु सुतार यांचे कोविड कालावधीत निधन झाल्याने विजय लुल्हे यांचे पितृछत्र क्रूर काळाने हिरावून घेतले.विविध क्षेत्रातील ज्या पितृतुल्य महानुभवांनी कुटुंबाप्रमाणेच समाजोन्नतीसाठी नि:स्वार्थीपणे योगदान दिले.युवकांना जीवनमूल्यांचे धडे दिले व महिला भगिनींच्या अन्याय निवारणार्थ झटले … या समर्पणशील योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.ऋणानुबंध दृढ व्हावेत. म्हणून पितृतुल्य मान्यवरांचा आशीर्वाद घेऊन चैतन्य व ऊर्जा मिळवून नव्या उमेदीने निरंतर समाजसेवा करावी या विशुद्ध हेतूने ‘ फादर्स डे ‘ निमित्ताने सत्काराचे आयोजन करण्यात आल्याचे पुस्तक भिशी संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी विनम्रपणे सांगितले.या उपक्रमाचा शुभारंभ चंदनाप्रती झिजणाऱ्या ऋषितुल्य आप्पासाहेब नीळकंठ गायकवाड ( निवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी ) यांच्या अभिवादनाने करून नैतिक बांधिलकीने हा उपक्रम निरंतर अनौपचारीक साजरा करण्याचा दृढ संकल्प यावेळी लुल्हे यांनी जाहिर केला.
**************************
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते महेश शिंपी सर यांचे वयोवृद्ध पिताश्री वसंत शिंपी ( ८६ वर्षे ) यांना बुके देऊन विजय लुल्हे यांनी निरोगी दिर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशिर्वाद घेतले.याप्रसंगी बाबांच्या स्नुषा शिक्षिका सौ.पल्लवी शिंपी,सुपुत्र महेश शिंपी सर,नातवंडे नील शिंपी व ईश शिंपी उपस्थित होते.श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ जळगाव संस्थेचे सचिव एम.टी.लुले यांचा शाल,श्रीफळ देऊन विजय लुल्हे यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला तत्पूर्वी एम.टी.लुले यांचे सुपूत्र किरण लुल्हे यांनी पिताश्रींचे कुंकूम तिलक करून औक्षण केले.त्यानंतर सर्वांनी नतमस्तक होऊन लुले बाबांचे शुभाशिर्वाद घेतले.याप्रसंगी गोपाळ उगवे,भुपेंद्र उगवे उपस्थित होते.