वरसाडे तांडा नंबर दोन मध्ये घाणीचे साम्राज्य, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील व पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या वरसाडे तांडा नंबर दोन या गावात ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून सत्ताधारी सरपंच, सदस्य यांच्याकडे समस्या सोडविण्यासाठी गेल्यावर संबंधित सत्ताधारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता वरसाडे तांडा नंबर दोन येथील नागरिकांनी दिलेली माहिती अशी की वरसाडे तांडा व इतर दोन तांडे असे तीन तांडे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. यापैकी वरसाडे तांडा नंबर दोन मध्ये काही महिन्यांपूर्वी सांडपाण्याच्या गटारी बनवण्यात आल्या आहेत. परंतु ह्या गटारी बनवितांना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेली नसल्याने सांडपाणी वाहून न जाता ते गटारीत तुंबत असल्याने गावात ठिकठिकाणी जलाशय तयार झाली आहेत. तसेच सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडासाही पाऊस पडल्यानंतर सांडपाणी व पावसाचे पाणी हे कचऱ्याने तुडुंब भरलेल्या गटारीतून वाहून न जाता गावातच जलाशय तयार होतील व काही घरात पाणी घुसेल अशी भीती ग्रामस्व्यथांनी क्त केली आहे.
यामुळे गावात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे दिवसभर शेतात काम करुन थकून, भागुन आलेले शेतकरी व मजूरांना रात्रभर डासांचा सामना करावा लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव जास्त असल्याने व यातच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने हवेचे पंखे बंद झाल्यावर लहान मुले, वृध्दांना झोप घेणे मुश्किल झाले आहे. तसेच डास चावल्यामुळे काहींना आजाराला सामोरे जावे लागत असल्याने दवाखाना खर्च करावा लागतो आहे.
विशेष म्हणजे ग्रामपचायतीवर कार्यरत असलेले सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांना गावातील समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले असता बघु, करु, पाहून घेऊ अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने गावातील सांडपाण्याच्या गटारींची त्वरित साफसफाई होत नसल्याने काही ग्रामस्थांनी सत्यजित न्यूजला संपर्क करुन गावातील समस्यांचा पाढा वाचला व येत्या आठ दिवसात वरसाडे तांडा नंबर दोन येथील सांडपाण्याच्या गटारींची साफसफाई करुन इतर समस्या न सोडल्यास आम्ही दिनांक १५ जुलै २०२३ शनिवार रोजी पंचायत समिती पाचोरा येथे जाऊन धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.