पाचोरा व लोहारा येथील गुटखा किंग, दोन तालुक्यातील तरुणांना आणतोय झिंग, अधिकाऱ्यांशी आहे त्यांची अर्थपूर्ण सेटिंग.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०५/२०२३
(ऐकावं ते नवलच)
पाचोरा शहरातील व लोहारा येथील गुटखा किंगचे नाव लहान, थोरांपर्यंतच नव्हे तर बालगोपालांनाही माहीत आहे. तसेच गुटख्याचा अवैध साठा कुठे आहे, कुठे असतो, कसा सप्लाय केला जातो याविषयीची सिनेस्टाईल चर्चा चौकाचौकात रंगत असतांनाही संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी गांधीजींच्या तीन माकडांची भुमिका घेत कारवाई करत नसल्याने अनेक शंका निर्माण होत आहेत.
महाराष्ट्र राज्यात तंबाखू युक्त गुटखा आणि तंबाखू युक्त सुगंधित सुपारी विक्रीवर बंदी असतांनाही पाचोरा शहरातील एक व लोहारा येथील एक गुटखा किंग हे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात शासनाने बंदी घातलेल्या तंबाखू यूक्त गुटखा व तंबाखू यूक्त सुगंधित सुपारीची खेडोपाडी जाऊन किराण दुकान, पानटपरी, लहानमोठे उपहारगृहात घरपोच सेवा देत दिवसाढवळ्या विक्री करतांना दिसून येत आहेत.
यामुळे शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू यूक्त सुपारीची पाचोरा शहरासह, गावागावातून तसेच वाडा, वस्तीवरील किराणा दुकानदार, पानटरी, लहानमोठ्या उपहारगृहाचे मालक या गुटख्याची व सुगंधित सुपारीची गाव, खेड्यातील हमरस्त्यावर, शाळा, कॉलेज जवळ, बसस्थानकात, धर्मस्थळांच्या जवळपास व इतर सार्वजनिक ठिकाणी खुलेआम विक्री करत असल्याचे दिसून येत आहेत.
कुठेही मुबलक प्रमाणात गुटखा मिळत असल्याने वाडा, वस्ती व गावागावातून लहान, लहान मुले, शालेय विद्यार्थी, तरुणवर्ग, जेष्ठ नागरिक तसेच महिलावर्ग या गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. तसेच हे गुटखा शौकीन गुटखा खाऊन बसल्या जागेवरच पिचकाऱ्या मारत असल्याने बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणी, ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच शाळा, कॉलेज, धर्मस्थळांच्या भिंती, ओके, मुताऱ्या सगळीकडे विद्रुपीकरण होऊन दुर्गंधी पसरली असल्याने सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे हा अपायकारक गुटखा खाण्यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या जास्त प्रमाणात असून या गुटख्याच्या व्यसनाच्या विळख्यात सापडून बऱ्याचशा तरुण व अल्पवयीन मुलांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे तसेच या वाढत्या व्यसनाधीनतेमुळे आपली तलफ भागवण्यासाठी पैशांची गरज भासल्यास तो पैसा मिळवण्यासाठी घराघरात खटके उडत आहेत. तर काही व्यसनाधीन लोक चोऱ्या करायला मागेपुढे पाहत नसल्याचे दिसून येत आहे.
विशेष वृत्त ~
पाचोरा शहरातील वर लोहारा येथील गुटखा किंग हे संपूर्ण पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव तालुक्यात ठोक स्वरूपात गुटखा सप्लाय करत असून नंतर हे इतर गुटखा विक्रेते स्वताच्या दुचाकी, चारचाकी किंवा रिक्षातून गावागावात व वाडा, वस्त्यांवर किरकोळ विक्रेत्यांना गुटख्याचा पुरवठा करत असल्याने पाचोरा, भडगाव, जामनेर, सोयगाव तालुक्यात सगळीकडे मुबलक प्रमाणात पाहिजे तेथे गुटखा विक्री होतांना दिसून येत आहे.
यात विशेष म्हणजे लोहारा येथील गुटखा किंग हा कधी दुचाकीवरुन तर चारचाकी किंवा तीन चाकी रिक्षा घेऊन गोळ्या, चॉकलेट, किराणा सामान विक्रीच्या नावाखाली कळमसरा, अंबे वडगाव, लोहारा, जामनेर, पहूर, सोयगाव, नेरी, कासमपुरा, म्हसास, कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक या तांड्यावर राजरोसपणे, दिवसाढवळ्या तंबाखू यूक्त गुटखा व तंबाखू यूक्त सुगंधित सुपारी मोठ्या प्रमाणात विक्री करतो याबाबत कुणीही मज्जाव केल्यास हमरीतुमरीवर येऊन आम्ही हप्ते देतो तुम्हाला काय अधिकार आहे असे सांगून हुज्जत घालत असतो म्हणून आतातरी अन्न व औषध प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
ही अवैध गुटखा विक्री कायमस्वरूपी बंद होण्यासाठी बऱ्याचशा गावातून सुज्ञ नागरिकांनी व काही समाजसेवकांनी वारंवार आवाज उठवला व गावात गुटखा विक्रीसाठी आणू नका अशी समज दिली असता आम्ही सगळ्यांना हप्ते देतो अशी भाषा वापरली जात आहे. तसेच यांचा हा नंगानाच सुरु असल्यावरही मात्र अद्याप पाचोरा व लोहारा येथील गुटखा किंग व किरकोळ विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जात नसल्याने संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी खरच हप्ते तर घेत नसतील ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.
“कारवाई न झाल्यास लवकरच आंदोलन”
गावागावातून सुरु असलेली गुटखा विक्री तसेच गावठी व देशी दारुची अवैध विक्री, सट्टा बेटिंग हे सर्व अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सुज्ञ नागरिक व महिलावर्गासह तरुण मंडळी गावचे सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, शांतता कमेटीचे अध्यक्ष व सदस्यांना साकडे घालणार असून त्यांनी हे अवैध धंदे बंद करण्यासाठी ठराव न केल्यास लवकर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गावातून देण्यात आला आहे.