शेंदुर्णीसह परिसरातील गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०७/२०२३
जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांनी हजेरी लावल्यापासून पहुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावागावातून अवैध धंदे बंद करण्यासाठी झाडाझडती सुरु केली आहे. ही मोहीम राबवत असतांनाच दिनांक २८ जूलै २०२३ शुक्रवार रोजी शेंदुर्णी पोलीस चौकीच्या हद्दीतील जंगीपुरा गावालगतच्या गोगडी नदीच्या काठावर मोकळ्या जागेत एक इसम कोणत्यातरी मादक पदार्थाचे सेवन करत असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांना मिळाली होती.
ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांनी शेंदुर्णी पोलीस चौकीवर कार्यरत असलेले उपनिरीक्षक मा. श्री. दिलीप पाटील, सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे, प्रशांत बडगुजर, यांना सोबत घेत दुपारी एक वाजेच्या सुमारास माहिती मिळालेल्या वरील ठिकाणी धाड टाकून संशयित इसम कातीराम हतांगळे वय वर्षे (२५) याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता संबंधित इसम हा पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथील रहिवासी असल्याचे व हल्ली मुक्काम शेंदुर्णी असल्याचे सांगत त्याने गांजा या आमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे मान्य केले. यावरुन पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांनी कातीराम हतांगळे याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ चिलम, माचीस पेटी हे साहित्य मिळून आले. हे मिळून आलेले साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले.
तसेच पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी केली असता त्याने गांजा व आमली पदार्थ सेवन केल्याचे आढळून आले म्हणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरून कातीराम हतांगळे याच्या विरुद्ध गुंगीकारक औषध द्रव्य व मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) कलम सह २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे पहूर पोलीस स्टेशनच्या तसेच शेंदुर्णी पोलीस चौकीच्या हद्दीतील गावागावातील गांजा, व आमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यसनाधीन लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून यापुढेही अश्याच कारवाया सुरु राहतील असे पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांनी सांगितले.