पाचोरा व जामनेर तालुक्यात रानडुक्कराची शिकार करुन मास विक्रीचा व्यवसाय तेजीत, वनविभागाची डोळेझाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०५/२०२१
पाचोरा व जामनेर तालुक्यातील राखीव जंगलात रानडुकरांची शिकार करून मास विक्री करणाऱ्या काही टोळ्या सक्रिय झाल्या असून रानडुकराचे मास ३००/०० रुपये किलो या दरात भरवस्तीत दिवसाढवळ्या विकले जात असल्याने हा प्रकार असाच सुरु राहिल्यास रानडुकराचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की राखीव जंगलातील नद्या, नाले यांना पाणी नसल्याने तसेच राखीव जंगल्याच्या आसपास असलेले तलाव व धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होऊन बरेचसे तलाव व धरणात पाणी नाही. तसेच वनविभागाकडून जंगलातील प्राण्यांसाठी पाणवठे तयार केले नसल्याने या राखीव जंगलातील हरण, रानडुक्कर, ससे, कोल्हे, लांडगे, मोर, लांडोर व इतर लहानमोठे प्राणी पाण्यासाठी वन वन फिरतांना दिसून येतात.
जंगल परिसरात पाणी नसल्याने या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळवण्यासाठी मानव वस्तीकडे यावे लागत असल्याने या संधीचा फायदा घेत थोड्या श्रमात बीना भांडवली पैसे कमावण्यासाठी काही लोकांनी जंगली प्राण्यांची शिकार करुन मास विक्री करण्याचा अवैध व्यवसाय सुरु केलेला आहे.
म्हणून हे शिकारी रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत पाणवठ्यांच्या ठिकाणी जाळे (वाघुर) लाऊन बसतात व पाणी पिण्यासाठी आलेले जंगली प्राणी यात अडकल्यावर त्यांना पकडून त्यांची हत्या करत मास विक्री करतात विशेष म्हणजे रानडुकराचे मास विक्री करतांना कश्याचीच भिती ध बाळगता भरवस्तीत दिवसाढवळ्या मास विक्री करतात.
हा प्रकार दिवसाढवळ्या सुरु असलातरी वनविभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने शिकार करणारांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असून काही शिकारी हरणाच्या शिकारी करतात असे जनमानसात बोलले जात आहे.
तरी वनविभागाने जंगली प्राण्यांसाठी जंगलात पाणवठे तयार करुन शिकाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी वन्यप्राणी प्रेमींनी केली आहे.