कुऱ्हाड येथे मापात पाप करणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांना गावकऱ्यांनी दिली तंबी.

सुनील लोहार.(पाचोरा)
दिनांक~१०/०२/२०२३

आपला जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर असला तरी यावर्षी शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव, शासकीय खरेदी व इतर उपाययोजना न केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटासह अनेक अडचणीत सापडला आहे. एका बाजूला याचाच फायदा घेत खाजगी कापूस व्यापाऱ्यांनी ही नामी संधी उचलून कापसाची खरेदी सुरु केले आहे. तर दुसरीकडे दैनंदिन व्यवहारात पूर्ण करण्यासाठी कापूस विकल्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी खाजगी कापूस व्यापाऱ्यांना कापूस विकत आहेत. याचाच फायदा घेत काही कापूस व्यापाऱ्यांनी हात काटा म्हणजे (ताण काट) स्प्रिंग काट्यावर कापूस मोजून घेत आपला व्यवसाय सुरु केला आहे.

परंतु पाचोरा तालुक्यातील बऱ्याचसे व्यापारी स्वताचे वाहन घेऊन तर काही स्थानिक व्यापाऱ्यांनी ताण काट्यावर कापूस मोजून घेतांना जास्त पैसा कमावण्यासाठी या ताण काट्यात हेराफेरी करत ताण काट्यातील स्प्रिंग तारेने बांधून तर काहींनी काट्यातील मापदर्शक पट्टी वाकवून व हात सफाई करत कमी वजनात जास्त कापूस मोजून घेण्यासाठी सपाटा लावला व मापात पाप करत शेतकऱ्यांची लुट सुरु केली होती. परंतु हा कापूस व्यापाऱ्यांचा गोरखधंदा कुऱ्हाड येथील शेतकऱ्यांनी दिनांक ०८ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी कुऱ्हाड येथील आठवडे बाजारात उधळून लावला असून या कापूस व्यापाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी कुऱ्हाड येथील सरपंच डॉ. प्रदीप महाजन व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मापात पाप करणाऱ्या शेतकऱ्यांना तंबी दिली आहे.

यावेळी यापुढे कोणत्याही कापूस व्यापाऱ्यांने आपला व्यवसाय करतांना ताण काटा वापरु नये. तसेच वजन माप निरीक्षक यांच्याकडून प्रमाणीत केलेला धडी काटा (वजन माप) वापरुन
आपला व्यवसाय करावा अशी समज देण्यात आली आहे. यावेळी ज्या व्यापाऱ्यांनी मापात पाप केले होते अश्या कापूस व्यापाऱ्यांना या ठिकाणी माफी मागायला लावली व त्यांच्याकडील ताण काटे कायमस्वरूपी ग्रामपंचायतीने जप्त करुन घेतले आहेत.

या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अरुण भाऊ पाटील, लोकमतचे जेष्ठ पत्रकार मा. श्री. सुनील लोहार, राजेंद्र न्हावी, मनोज शिंपी यांनी शेतकऱ्यांच्या अडिअडचणींचा पाढा वाचून कापूस व्यापाऱ्यांनी केलेल्या प्रकाराबद्दल तिव्र शब्दात आपले मत मांडले. यावेळी कुऱ्हाड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाचे ~ दिनांक ०८ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी कुऱ्हाड गावात चार ते पाच कापूस व्यापाऱ्यांना मापात पाप करतांना पकडण्यात येऊन त्यांच्याकडे असलेले ताण काटे जमा करण्यात आले होते. यामध्ये शिंदाड येथील एका कापूस व्यापाऱ्याचाही काटा जमा करण्यात आला होता. व या संबधीत व्यापाऱ्याला आजच्या बैठकीत येण्यासाठी भ्रमणध्वनीवर सांगितले होते. मात्र संबंधित कापूस व्यापाऱ्यांने या बैठकीत हजर न रहाता आपला चेहरा लपवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे. तरी अश्या लबाडी करणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांपासून सावध रहावे असे आवाहन कुऱ्हाड ग्रामस्थांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या