पाचोरा पोलिस स्टेशनला सक्षम अधिकारी नसल्याने, प्रभारी अधिकाऱ्यांची धावपळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०२/२०२३

(पाचोरा पोलिस स्टेशनला मा. श्री. राहुल खताळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा असल्याने ते येण्याआधीच अवैध धंदे करणारांची पायाखालची वाळू सरकली आहे.)

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हे जवळपास एक लाख लोकवस्तीचे तालुक्याचे शहर आहे. या पाचोरा शहरासह आसपासच्या ७६ गावांची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पाचोरा शहरात मध्यवर्ती ठिकाणी पोलिस स्टेशन असून या अंतर्गत एक पोलिस चौकी चार बिट आहेत. असे असले तरी पाचोरा शहरातील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. नजन पाटील यांची मागील चार महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. तेव्हापासून आज पाचवा महिना उजाडला तरीही त्यांच्या जागी नवीन सक्षम पोलिस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली नसल्याने पहुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे साहेब व उपनिरीक्षक मा. श्री. जितेंद्र वल्टे साहेब हे कामकाज पहात आहेत.

असे असले तरी पाचोरा हे तालुक्याचे शहर असून ७६ गावांच्या कायदा सुव्यवस्थेचा भार या पोलिस स्टेशनला सांभाळावा लागत आहे. पाचोरा शहर ही मोठी बाजारपेठ असून शाळा, कॉलेज, न्यायालय, शासकीय कार्यालये, पाचोरा आगार, रेल्वेस्थानक असल्याकारणाने तसेच मुंबई, नागपूर या मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या, येणाऱ्या लोकांची, दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या लोकांची व विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रहदारीच्या प्रश्नासह अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी पाचोरा पोलिस स्टेशनला चांगल्या सक्षम पोलिस अधीकाऱ्याची गरज आहे.

परंतु मागील चार महिन्यांपूर्वी पाचोरा पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक मा. श्री. नजन पाटील यांची बदली होऊन आता पाचवा महिना उजाडला तरीही पाचोरा पोलिस स्टेशनला नवीन पोलिस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली नसल्याने एका बाजूला या पोलिस स्टेशनला प्रभारी अधिकारी चांगल्याप्रकारे कामकाज पहात आहेत.

मात्र दुसरीकडे पाचोरा शहरासह पाचोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावागावातून सट्टा, पत्ता, जुगार, शासनाने बंद घातलेल्या गुटख्याची खुलेआम विक्री, अवैध वाहतूक, लहानमोठ्या चोऱ्या, रोडरोमीयोंची दादागिरी वाढत असल्याचे दिसून येत असली तरी प्रभारी अधिकारी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन रात्रंदिवस मेहनत घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तारेवरची कसरत करत असतांना दिसून येतात.

म्हणून पाचोरा शहरासह ७६ गावातील एकूण लोकसंख्येचा विचार केला व एखाद्यावेळी कायदा, सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास या प्रभारी अधिकाऱ्यांना वरिष्ठांची परवानगी व मार्गदर्शन घेणे किंवा जास्तीची कुमक मागवण्यात वेळ जाऊ शकतो म्हणून पाचोरा पोलिस स्टेशनला चांगल्या सक्षम अधिकाऱ्यांची त्वरित नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरीकातून केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या