पदपथ (फुटपाथ) दाखवा बक्षीस मिळवा, पदपथावर अतिक्रमण रहदारीला अडथळा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०२/२०२२
पाचोरा शहरात रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला असून बाहेरगावाहून आलेल्या लोकांना तसेच वाहनधारकांना याचा खुपच त्रास सहन करावा लागत असून एकमेकांना धक्का लागणे, वाहनांची कटबाजी अश्या अनेक समस्या जानवत असून यातूनच लहान, मोठे वादविवाद होत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा म्हणजे रुग्णवाहिका व पोलिस वाहनांना योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरात जाण्यासाठी व शहरातून बाहेर निघण्यासाठी जारगाव चौफुली ते मानसिंगका कॉर्नर हा रस्ता आजच्या घडीला एकमेव व महत्त्वाचा ठरत आहे. कारण कृष्णापुरी परिसरातील हिवरा नदिवर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली असून या पुलाचे काम होण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे.
तसेच बाहेरगावच्या लोकांना भडगाव रोडकडून पाचोरा शहरत येतांना भुयारी मार्गातून मालवाहतूक करणारी मोठी वाहने आणण्यासाठी शक्य होत नसल्याने मुख्य वाहतूक जारगाव चौफूली कडून बसस्थानक व मानसिंग कॉर्नर अशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
परंतु याच परिसरात आपले व्यवसाय थाटलेल्या दुकानदारांनी थेट पदपथावर म्हणजेच फुटपाथवर आपल्या दुकानातील विक्रीची सामान लावल्यामुळे पायी चालण्यासाठी असलेला पदपथ (फुटपाथ) झाकला गेला आहे. तसेच या रस्त्यावरील वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने पायी चालणाऱ्या वाटसरुंना विशेष करुन मुलाबाळांसह कामानिमित्त पाचोरा शहरात आलेल्या महिलांना या वाहनांचा सामना करत जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
असेच अतिक्रमण मानसिंगका कॉर्नर ते जैन पाठशाळेपासून वाघ डेअरी पर्यंत व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रेल्वे स्टेशन पर्यंतच्या रस्त्यावर झालेले आहे. या अतिक्रमणासोबतच हातगाडीवर भाजीपाला, फळफळावळ, कटलरी व इतर वस्तू विकणारे व्यवसायीक भररस्त्यात हातगाड्या उभ्या करून आपला व्यवसाय करतांना दिसून येतात. रहदारीला अडथळा होतो म्हणून यांना कुणी हटकल्यावर हे संघटित होऊन हमरीतुमरीवर येऊन वाद घालतात वेळ पडल्यास अंगावर धाऊन येतात म्हणून पाचोरा नगरपरिषदेने या वाढत्या अतिक्रणचा विचार करुन त्वरित धडक मोहीम राबवून हे अतिक्रमण काढणे गरजेचे झाले आहे. अशी मागणी पाचोरा येथील शिस्तप्रिय दुकानदार (व्यवसायिक) पाचोरा शहरातील व पाचोरा शहरात दैनंदिन कामानिमित्त येणारे नागरिक, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी व महिला वर्गाकडून होत आहे.
शासकीय कार्यालये वाहनांच्या विळख्यात
पाचोरा शहरातील प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, रजिस्टार ऑफिस, विशेष महत्वाचे म्हणजे पोलीस स्टेशन व नगरपालिकेचा दवाखाना ही सगळी कार्यालये एकाच ठिकाणी असून या कार्यालयात दैनंदिन कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. बाहेरगावाहून येणारे लोक स्वतःच्या दुचाकी व चारचाकी येत असतात परंतु पाचोरा शहरात नवनवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स, शासकीय कार्यालये व इतर वास्तू उभारतांना कार्यालयाची उभारणी करतांंना वाहनतळाची कुठेही व्यवस्था केली नसल्यामुळे येणाऱ्या लोकांना आपली वाहने नाईलाजास्तव चौकाचौकात किंवा कार्यालय परिसरात भर रस्त्यावर उभी करावी लागतात. यामुळे अती महत्वाची कार्यालये वाहनांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली जातात या वाहनांच्या वर्दळीमुळे विशेष करून रुग्णवाहिका व पोलिसांना अत्यावश्यक सेवेसाठी निघतांंना उशीर होतो. तरी या कार्यालय परिसरात कुठेतरी वाहन तळ उभारण्यात यावे अशी मागणी होत आहे.
पाचोरा शहरात एका बाजूला धनदांडग्याचे भररस्त्यावर अतिक्रमण असतांनाच दुसरीकडे पाचोरा शहरातील भाजी मंडीतील अतिक्रमणाचे कारण पुढे करुन खेडेगावातून छोटेसे टोपले घेऊन आलेल्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर व शहरातील छोट्या, छोट्या अतिक्रमण धारकावर कार्यवाही का ? असाही प्रश्न हातावर पोट भरण्यासाठी धडपड करणारे व्यवसायिक विचारात आहेत.
पाचोरा शहराती शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी प्रत्येक पाच महिन्यानंतर अतिक्रमण मोहीम राबवली जाते व या मोहिमेसाठी प्रत्येक वेळेस जनतेने दिलेल्या विविध करापोटी मिळालेल्या पैशाची उधळपट्टी करुनही कायमस्वरूपी अतिक्रमण थांबवण्यात यश येत नसल्याने हा खर्च निकामी ठरत आहे.
तसेच नगरपरिषदेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी ओटे बांधून दिलेले आहेत. परंतु या बांधलेल्या ओट्यांंवर भाजीपाला विक्रेते बसण्यास तयार नाहीत. म्हणून अतिक्रमणाचे हत्यार वापरुन भाजीपाला विक्रेत्यांना वेठीस धरल्यास हे विक्रेते त्या बांधलेल्या ओट्यावर जातील असा नगरपरिषदेचा अंदाज आहे असेही बोलले जाते.