पाचोरा ते अंबे वडगाव १६ किलोमीटर अंतराच्या दरम्यान २२ गतिरोधक अपघाताची मालिका सुरुच.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०८/२०२२
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर ‘पाचोरा ते अंबे वडगाव’ या १६ किलोमीटर अंतराच्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पाच, दहा नव्हे तर चक्क २२ गतिरोधक बसवण्यात आले असून या गतिरोधकावर वाहने आदळून दररोज लहान, मोठे अपघात होत आहेत. तसेच जास्त वजनदार माल वाहून नेणाऱ्या ट्रक, टेम्पो व इतर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची मोडतोड होत असल्याने मालवाहतूक करणारे वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या महामंडळाच्या एस.टी. बसेस व खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे मालक, चालक हैराण झाले आहेत.
दिनांक १५ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी सगळीकडे स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतांनाच दुसरीकडे मात्र जामनेर ते पाचोरा रस्त्यावर गतीरोधकाजवळ (पुढे गतीरोधक आहेत) किंवा गतीरोधकावर पांढरे पट्टे म्हणजे (झेब्रा क्रॉसिंग) नसल्याने पुढे गतीरोधक आहेत ही बाब दुचाकीस्वाराच्या लक्षात न आल्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या एका निष्पाप महिलेचा बळी गेल्याची घटना दिनांक १५ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी दुपारी ‘साडे अकरा’ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील लोहारी गावाजवळ घडली असून या अपघाताने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा भांडाफोड झाला आहे.
याबाबत सत्यजित न्यूज कडून पाठपुरावा करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा भांडाफोड केला आहे. कारण रस्त्यावर गतिरोधक बसवण्याआधी पुढे गतीरोधक आहेत आपली वाहने हळू चालवा असा सुचना व मार्गदरशक फलक लावणे क्रमप्राप्त आहे. तसेच गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे (झेब्रा क्रॉसिंग) करुन रात्रीच्यावेळी पुढे गतिरोधक आहेत ही बाब वाहन धारकांच्या लक्षात येण्यासाठी लाल रंगाचे रेडियम स्टिकर (रिफ्लेक्टर) लावणे बंधनकारक असतांनाही या सर्व बाबींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कमालीचे दुर्लक्ष केले असल्यामुळे आजपर्यंत या रस्त्यावर बरेचसे अपघात होऊन काहींना आपला जीव गमावला आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
तसेच याच रस्त्यावरून वापरणाऱ्या वाहनधारकांना या गतिरोधकामुळे अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे. म्हणून पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाचोरा ते अंबे वडगाव रस्त्याचे सर्व्हेक्षण करुन अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत व इतर ठिकाणी गरज नसतांना बसवलेले गतिरोधक काढून टाकत ज्या, ज्या ठिकाणी गतिरोधक आहेत त्या, त्या ठिकाणी सुचना (मार्गदर्शक) फलक, गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे (झेब्रा क्रॉसिंग) तसेच रात्रीच्यावेळी गतिरोधक आहेत हे समजून येण्यासाठी रेडियमचे रिफ्लेक्टर बसवून देण्यात यावेत अशी मागणी असंख्य वाहनधारक व सुज्ञ नागरिकांनी केली असून येत्या आठ दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.