पोलीस कर्मचाऱ्यावर उचलला हात, आरोपींची निघाली गावातून वरात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२३

खाकीवर हात उचलणाऱ्या गुन्हेगारांच्या पहूर पोलीसांनी मुसक्या आवळत गावभर वरात काढून भर चौकात फटके देत गुंड प्रवृत्तींना जन्माची अद्दल घडवली असून जनमानसतून पोलीसांच्या या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे हे १४ जानेवारी २०२३ शनिवार रोजी पहूर बसस्थानक परिसरात कर्तव्य बजावत असतांना फिरोज शेख, सुपडू शेख व त्यांचा साथीदार खाजा तडवी हे रस्त्यावर दुचाकी लावून उभे होते. या रस्त्यावर लावलेल्या दुचाकीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होता. म्हणून संबंधितांना दुचाकी बाजूला घेण्यासाठी सांगितले असता त्यांना त्याचा राग येऊन फिरोज शेख, सुपडू शेख व खाजा तडवी यांनी पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांच्याशी हमरीतुमरीवर येऊन धक्काबुक्की करत हात उचलला होता. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागल्याने त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ही घटना घडल्यानंतर संबंधित हल्लेखोर घटनास्थळावरून लगेचच पसार झाले होते. या घटनेमुळे पहूर गावांसह पंचक्रोशीतील गावागावातून संतप्त भावना व्यक्त करत अहोरात्र जनतेची सेवा करणारे पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न उपस्थित करत संबंधित हल्लेखोरांना कठोरात, कठोर शासन व्हावे अशी मागणी केली होती.

आरोपी फरार झाल्यापासून पहूर पोलीसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी गोपनीयता बाळगत मिळालेल्या माहितीवरुन सापळा रचून दिनांक १९ जानेवारी २०२३ गुरुवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास परभणी येथुन दोन हल्लेखोर संशयितांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या व दिनांक २१ जानेवारी २०२३ शनिवार रोजी जामनेर न्यायालयात हजर केले असता संशयित हल्लेखोरांना मा. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आरोपींना पहूर येथे आणल्यानंतर श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर तसेच पहूर गावातील मुख्य चौकाचौकातून फटके देत धिंड काढली.

आरोपींची काढलेली धिंड व पहूर पोलीसांचा आक्रमक भूमिका पाहण्यासाठी पहूर बसस्थानक व रस्त्यावर मोठ्या संख्येने बघ्याची गर्दी जमली होती. गुन्हेगारीचे वाढते उदात्तीकरण रोखण्यासाठी गुन्हेगारांची वरात काढून चौकाचौकात फटके देणे अंत्यत गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य जनता व सुज्ञ नागरिकांनी व्यक्त करत पहूर पोलीसांच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. या कारवाईमुळे पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या पाया खालची वाळू सरकली असून मागील काळात पहूर पोलीस स्टेशनला मा. श्री. चाफेकर साहेब असतांना असाच वचक होता याची आठवण पहूर येथील नागरिकांना झाली.

ही कारवाई पहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मा. श्री. अमोल गर्जे, पोलीस कॉन्स्टेबल विनय सानप, ज्ञानेश्वर भाकरे, ईश्वर कोकणे यांचा सहभाग होता. पहूर पोलीस स्टेशनला मा. श्री. प्रतापराव इंगळे साहेब हजर झाल्यापासून पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे इतर गैरप्रकार बंद झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या