पिंपळगाव हरेश्र्वर येथील गणेश पाटील यांच्या शेतातील झटका मशिन, सोलर प्लेट व बॅटरी लंपास.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०१/२०२३
सद्यस्थितीत शेतकरीवर्ग जंगली प्राण्यांपासून आपल्या शेतातील पिकांचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असून रात्रीच्या वेळी रानडुक्कर, निलगाय व वानरांना हाकलून लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे भेसूर आवाज व कुत्र्याच्या आवाजाचे रेकॉर्डिंग करुन स्वयंचलित लाऊडस्पिकरच्या माध्यमातून तसेच शेतातील पिकांच्या सभोवती ताराचे कुंपण घालून त्या तारांमध्ये सौम्य असा विद्युत प्रवाह सोडून झटका मशिन बसवून जंगली जनावरांना हाकलून लावण्यासाठी या उपकरणाचा वापर करत आहेत.
परंतु हा लाऊडस्पिकर चालवण्यासाठी त्याला विद्युतपुरवठा गरजेचा असल्याकारणाने एकतर सोलर पॅनल किंवा चार्जेबल बॅटरीची बसवून हा खटाटोप केला जात आहे. असेच उपकरणाचा उपयोग पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वरचे शेतकरी गणेश गोविंदा पाटील यांनी त्यांच्या पिंपळगाव हरेश्र्वर शिवारातील पिंपरी रस्त्यावरील श्री. दत्त मंदिराजवळील गट नंबर ४२८/०२ या शेतातील मका पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून स्वयंचलित लाऊडस्पिकर व झटका मशिन बसवले होते.
परंतु गणेश पाटील हे २४ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी नियमितपणे शेताकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना मका पिकाचे नुकसान व तारेचे कुंपण अस्तव्यस्त झालेले दिसून आले. म्हणून त्यांनी झटका मशिन व कर्कश आवाजासाठी बसवलेला लाऊडस्पिकर जवळ जाऊन पाहिले असता त्यांना त्या ठिकाणाहून सोलर पॅनलची प्लेट व झटका मशिन नंबर ३९८५ जागेवर दिसून न आल्यामुळे त्यांनी शेतात शोधून पाहिले असता ते कुठेही मिळून न आल्यामुळे आपल्या शेतातील सोलर पॅनलची प्लेट व झटका मशिन चोरीला गेल्याची खात्री झाल्यावर गणेश पाटील यांनी थेट पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला जाऊन रितसर तक्रार दाखल केली असल्याचे गणेश पाटील यांनी सांगितले.