जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये १२ जानेवारी पासून वरखेडी येथील गुरांचा बाजार पूर्ववत सुरु.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०१/२०२३
जळगाव जिल्ह्यासह सगळीकडे गोवंशीय पशुधनास लंम्पी (कातडीचा) चर्मरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. ही बाब लक्षात येताच शासनाने त्वरित दखल घेऊन नियंत्रित क्षेत्र घोषित करत त्या क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशी यांची ने, आण करण्यास, प्राण्यांचे बाजार, प्राण्यांच्या शर्यती, प्राण्यांच्या जत्रा व प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच लंम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येताच शासन, प्रशासनाने अथक परिश्रम घेऊन झपाट्याने लसीकरण मोहीम राबवून शंभर टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे लंम्पीचा प्रादुर्भाव थांबला असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत महाराष्ट्र शासन अधिसुचना दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ नुसार जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा. श्री. अमन मित्तल यांनी जिल्हयातील लंम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर सद्यस्थितीत लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ महाराष्ट्र अधिसुचना दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ अन्वये प्राप्त अधिकारान्वये जळगांव जिल्हयातील गोवंशीय पशुधनास लंम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्हयातील प्राणी बाजार भरवीणे तसेच जिल्हयातर्गत गुरांची वाहतुक करणे या करिता खालील अटीच्या अधिन राहून मान्यता दिली असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा अंतर्गत येणाऱ्या वरखेडी येथील उपबाजार समितीच्या मार्केट मध्ये येत्या १२ जानेवारी २०२३ गुरुवार पासून पुर्ववत गोवंशीय गुरांचा आठवडे बाजार भरणार आहे.
परंतु बाजारात आपली गुरेढोरे आणतांना गुरांचे लंम्पी चर्मरोगाकरीता प्रतिबंधक लसिकरण झालेले असणे आवश्यक आहे. गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे आवश्यक असल्याच्या आटी घालण्यात आल्या आहेत. तसेच जवळजवळ लंम्पीचा संपूर्णपणे नायनाट झाला असल्याने जळगाव जिल्ह्यातील गुरांचे भरणारे आठवडे बाजार पूर्ववत सुरु करण्यात आले आहे.