प्लास्टिक कॅरीबॅग बंदीला पाचोरा शहरातून खो, सगळीकडे आनंदी आनंद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१२/२०२२

(सुज्ञ नागरिकांच्या प्रतिक्रिया ~ केंद्र सरकारने बंदी घातलेल्या कॅरी बॅगची निर्मिती व ठोक विक्रेत्यांवर कारवाई करावी)

आपल्या देशातील प्लास्टिकच्या वाढत्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलत १ जुलै २०२२ पासून कॅरी बॅग, कप, प्लेट्स आणि स्ट्रॉजसारख्या सर्व वापरात असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर देशात बंदी घालण्यात आहे. या बंदीमुळे पॉलिथीन पिशव्यांची जाडी ५० मायक्रॉनवरून १२० मायक्रॉनपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच सिंगल यूज प्लास्टिक वस्तूंची निर्मिती, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली असून केंद्र सरकार व पर्यावरण मंत्रालयाने तशी अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार १ जुलै २०२२ पासून पॉलिस्टीरीन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. तसेच पिशव्या उत्पादक किंवा ब्रँड मालकांनी त्या विकण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (सी.पी.सी.बी.) प्रमाणपत्र घेणं आवश्यक असल्याचे सुचीत केले आहे. यामुळे सरकारचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात होते. कारण देशातील एकूण प्लास्टिक कचऱ्यापैकी ४० टक्के कचरा रोज जमा होत नाही. प्लास्टिक कचऱ्यामुळे गटारी तुंबतात आणि नदीचे पाणी, माती आणि पाणी दूषित होते, भटके प्राणी खातात आणि तसंच मोकळ्या हवेत जळत असल्याने प्रदुषण वाढते यापासून आपला बचाव होऊन पर्यावरणाचे रक्षण तसेच जीवसृष्टीचे रक्षण होणार होते.

याकरिता एकाचवेळी बंदी लादणे शक्य नसल्याने व जनतेच्या अडिअडचणी लक्षात घेऊन पॉलिथीन पिशव्यांमधील सुधारणा दोन टप्प्यात लागू करण्यात होती. यात ३० सप्टेंबर २०२१ पासून पहिला टप्प्यात सर्व ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर दुसरा टप्पा हा ३१ डिसेंबर २०२२ पासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यात १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली जाणार असली तरी देशात सध्या ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली असली तरी या पिशव्यांची विक्री व वापर मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येते आहे. तसेच फुग्यांचे प्लास्टिक, प्लास्टिकचे झेंडे, कँडीच्या काड्या, आइस्क्रीमच्या काड्या, सजावटीसाठी पॉलिस्टीरिन, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी, काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेट्सवर बंद करणे अत्यंत गरजेचे आहे.

(गावठी दारु विक्री करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅरी बॅग)

असे असले तरी पाचोरा शहरासह पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात प्लास्टिक कॅरीबॅगचा सर्रासपणे वापर सुरु असल्याचे दिसून येत आहे. पाचोरा शहरातील भाजीपाला विक्रेते, फळफळावळ विक्रेते, किराणा दुकान, हॉटेल व्यवसायीक, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, विशेष करुन गावठी दारू विक्री करतांना व औषधालयातही औषधी देतांना शासनाने बंदी घातलेल्या कॅरी बॅगचा खुलेआम दिवसाढवळ्या वापर होतांना दिसून येत आहे.

केंद्र सरकारने कॅरी बॅग वापरावर बंदी घातल्यानंतर सुरवातीला पाचोरा नगरपालिकेने कॅरी बॅग वापरणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यवसायीकांवर कारवाई केली होती. यामुळे पाचोरा शहरातील कॅरी बॅगचे ठोक विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फळफळावळ विक्रेते, किराणा दुकान व हॉटेल व्यवसायीक, कापड दुकानदार, जनरल स्टोअर्स व लहानमोठ्या व्यवसायीकांच्या आनंदावर विरजण पडले होते.

म्हणून कि काय कॅरी बॅग बंद झाल्यामुळे नाराज झालेल्यांचे जीवन आनंदी, आनंद आणण्यासाठी पाचोरा शहरातील एका कॅरी बॅगच्या ठोक (होलसेल) व्यवसायीकाने कायद्याची तमा न बाळगता कायदा खिशात ठेवून पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यातील गावागावांतील व्यवसायीकांना घरपोच कॅरी बॅग पुरवण्यासाठी विडा उचलला असून हा ठोक विक्रेता दिवसाढवळ्या, राजरोसपणे, बिनधास्तपणे कॅरी बॅगची विक्री करतांना दिसून येते आहे. यामुळे सद्यस्थितीत सगळीकडे आनंदी, आनंद दिसून येत असल्याने सगळ्यांच्या मुखातून त्या कॅरी बॅग विक्रेत्याबद्दल आनंद व्यक्त केला जात असल्याचे दिसून येत आहे.

(कॅरी बॅग मध्ये आणलेला चहा पिणे म्हणजे कॅन्सरला निमंत्रण.)

या कारणांमुळे कॅरी बॅगच्या सर्रास वापरामुळे पाचोरा शहरासह तालुक्यातील गावावात घाणीचे साम्राज्य पसरले असून उकिरड्यावर पडलेल्या कॅरी बॅग पाळीव प्राण्यांच्या खाण्यात येत असल्याने त्यांना पोटफुगी (फॉरेन बॉडी) व इतर व्याधींना सामोरे जावे लागत असून यातूनच प्राणी मृत्यूमुखी पडत असल्याने पशुपालकांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला उकिरड्यावर पडलेल्या या कॅरी बॅग मधील खाद्य खाण्यासाठी कुत्रे व डुकरं मोठ्या संख्येने रस्त्यावर पळत सुटतात व यातुनच रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांचे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

म्हणून आतातरी केंद्र सरकारने कॅरी बॅग वापरावर घातलेल्या बंदीचा फज्जा उडवत बेशरम पणाने (आनंद) व्यक्त करणाऱ्या कॅरी बॅगच्या ठोक (होलसेल) विक्रेत्यांवर तसेच व्यवसायीकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या