चाळीसगाव आगाराच्या वाहकाची मनमानी, विद्यार्थीनींच्या डोळ्यात पाणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१२/२०२२

एका बाजूला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे हात दाखवा गाडी थांबवा असे प्रचार फलक लाऊन प्रवाशांना आवाहन केले आहे. तर दुसरीकडे बस थांब्यावर प्रवासी उभे असतांनाही एस. टी. बस न थांबताच याच परिवहन महामंडळाचे वाहक व चालक एस. टी. बस आपल्याच बापाची समजून निघून जात असल्याचे प्रकार वाढल्याने या वाहक, चालकांबाबत एस. टी. च्या प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

असाच काहीसा प्रकार दिनांक १७ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी वरखेडी बसस्थानक परिसरात घडला असल्याने सुज्ञ नागरिकांनी व प्रवाशांनी संबंधित वाहकावर चाळीसगाव आगार व्यवस्थापकांनी रितसर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी येथून दररोज विस ते पंचवीस मुले, मुली एस. टी. ने शेंदुर्णी येथील शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात व परत येतात या प्रवासाकरीता एस.टी. नियमानुसार प्रवास भाडे देऊन किंवा मासिक पास काढून ते प्रवास करतात म्हणून दररोजच्या प्रमाणे दिनांक १७ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी सकाळी अंदाजे साडेआठच्या सुमारास काही विद्यार्थीनी एस. टी. बसची वाट पाहत उभे होत्या याच वेळात चाळीसगाव आगाराची चाळीसगाव ते बुलढाणा ही बस वरखेडी बसस्थानकाजवळ येऊन थांबली होती.

म्हणून नियमितपणे प्रवास करणाऱ्या सहा ते सात विद्यार्थीनी वरखेडी येथून शेंदुर्णी जाण्यासाठी बसमध्ये चढतांना बस मध्ये दिवटीवर असलेल्या वाहकाने त्या विद्यार्थिनींना मध्येच अडवून सांगितले की ही बस शाळा, कॉलेज जवळ थांबणार नाही थेट शेंदुर्णी गावात जाऊन थांबेल तुम्हाला बसायचं असेल तर बसा नाहीतर खाली उतरा माझ्या बाबत कुठेही तक्रार करा माझे काही होणार नाही अशा भाषेत सांगितल्यावर विद्यार्थिनींनी संबंधित वाहकाला हात जोडून विनंती करत सांगितले की आमची आज परीक्षा आहे तरीसुद्धा संबंधित वाहकाने काहीही ऐकून न घेता त्याचे म्हणणे कायम ठेवले यामुळे या विद्यार्थिनी रडकुंडीला आलेल्या होत्या. या विद्यार्थिनींची परिस्थिती पाहून वरखेडी बस स्थानकातील काही लोकांनी मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न केला असता संबंधित वाहकाने त्यांच्याशी हुज्जत घातली परंतु शेवटी ग्रामस्थांनी विनवण्या करून त्या विद्यार्थिनींना त्या बस मध्ये बसवून शेंदुर्णी कडे रवाना केले म्हणून विद्यार्थीनींना परिक्षेला जाता आले.

विशेष म्हणजे शनिवारी चाळीसगाव ते बुलढाणा बसवर दिवटीवर असलेला वाहक हा प्रवाशांना व विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी त्रास देत असतो अश्या तक्रारी समोर येत आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता संबंधित वाहक हा कायमस्वरूपी प्रवाशांना चांगली वागणूक देत नसून विद्यार्थी वर्गाला मुद्दामहून त्रास देत असतो अश्या तक्रारीही समोर येत असल्याने संबंधित वाहकावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याला समज देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. 

ब्रेकिंग बातम्या