दवाखान्याच्या बांधकामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई व्हावी कोल्हे येथील सतिश गोपाळ यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेसाठी संरक्षण भिंत (वॉल कंपाउंड) साठी तसेच नवीन दवाखाना बांधण्यासाठी जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांच्या निधीतून या छोट्याशा गावात शासनातर्फे लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र या निधीतून शाळेच्या सरंक्षण भिंतीचे व दवाखाना इमारतीचे बांधकाम चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे होते परंतु हे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार कोल्हे येथील ग्रामपंचायत सदस्य सौ. सपना सतीश गोपाळ यांचे पती व जागरूक नागरिक सतीश गोपाळ यांनी वारंवार तक्रार केलेली आहे.
नियमानुसार तक्रार केल्यानंतर सदर बांधकामाची चौकशी होणे गरजेचे होते. परंतु संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही. उलट निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या कामाबाबत मनात राग ठेवून संबंधित ठेकेदाराने त्यांच्या काही मजुरांच्या साह्याने सतीश गोपाळ यांना दोन वेळा मारठोक केल्याचा प्रकार घडला असून याबाबत पाचोरा पोलिस स्टेशन व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोल्हे येथील रहिवासी सतीश गोपाळ यांनी डिसेंबर महिन्यात दवाखान्याचे व दवाखान्याच्या सरंक्षण भिंतीचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार केली होती. व निकृष्ट होणारे काम थांबवले होते. ही तक्रार केल्यानंतर सतीश गोपाळे काही कामानिमित्त पाचोरा येथे गेले असता दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजीच्या संध्याकाळी सहा तीस वाजेच्या सुमारास पाचोरा ते जामनेर रोडवर रविराज हॉटेलच्या पुढे सार्वजनिक ठिकाणी अडवणूक करून काही अज्ञात इसमांनी सतीश गोपाळ यांना मारठोक करत तू दवाखान्याचे व शाळेच्या सरंक्षण भिंतीच्या बांधकामाची वारंवार तक्रार का करतो तू ठेकेदार अभिलाष येवले यांना त्रास का देतो हे थांबवा नाहीतर तुला मागत पडेल अशी धमकी देत माळठोक केली होती. या कारणास्तव सतीश गोपाळ यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला अज्ञात मारेकऱ्यांचे व ठेकेदार अभिलाष येवले यांच्या विरोधात दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार दाखल केले असून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डिसेंबर महिन्यात तक्रार दाखल केली असल्यावरही पाचोरा पोलिसांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष करत अद्याप कोणतीही चौकशी केलेली नाही. असे असतांनाच ठेकेदार यांनी १७ जानेवारी २०२२ सोमवार रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास काही मजूर पाठवून रात्रीच्यावेळी बांधकाम सुरु केली हे बांधकाम सुरु असतांनाच सतीश गोपाळ हे काही गावकऱ्यांसह शेकोटीवर अंग शेखत असतांना त्यांना हा प्रकार दिसला म्हणून सतीश गोपाळ यांनी बांधकामाचे ठिकाणी जाऊन एवढ्या रात्री काम करण्याची गरज काय असे बांधकाम मजूरांना विचारले व काम निकृष्ट होत असल्याची तक्रार केली तेव्हा आमचे ठेकेदार अभिलाष येवले यांनी बांधकाम करण्यासाठी पाठवल्याचे सांगितले.
ही घटना घडत असतांना घटनास्थळी सुपरवायझर तुळशीदास हिलाल पाटील हे हजर होते तू नेहमीच तक्रारी करतो असे म्हणत वाद घातला याच वेळी रामचंद्र पाटील, कैलास पाटील, बापू पाटील व कृष्णा पाटील हे आले त्यावेळी ठेकेदार अभिलाष येवले हे पिंपळगाव हरेश्वर रेल्वे स्टेशनवर हजर होते असे सतीश गोपाळ यांचे म्हणणे असून ते तेथूनच भ्रमणध्वनीवर त्यांच्या मजूरांना या बाबत माहिती देत होते असा आरोप सतीश गोपाळ यांनी करत ठेकेदार अभिलाष येवले यांच्या सांगण्यावरुनच या सुपरवायझर व मजूरांनी वाईट शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व ते म्हणाले की आम्ही तुझे पाय तोडून टाकू असे म्हणत दमदाटी केली. ही घटना घडत असतांना घटनास्थळी शकुर तडवी, गोकुळ ईश्वर गोपाळ, किरण सोनवणे हे प्रत्यक्ष हजर होते त्यांनी घटना प्रत्यक्ष पाहिली व झगडा वाढू नये म्हणून मध्यस्थी करत रात्रीच्यावेळी झगडि मिटवला या घटनेवरून सतीश गोपाळ यांनी दिनांक १८ जानेवारी मंगळवार रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन रितसर गुन्हा नोंद करून ठेकेदार व त्यांच्या मजूरांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून संबंधित ठेकेदार व मजूरांपासून माझ्या जिवीताला धोका असल्याचे म्हटले आहे.
दवाखान्याच्या निकृष्टपणे होत असलेल्या बांधकामाबाबत वारंवार तक्रारी करुनही काहीएक फायदा होत नसून उलट तक्रारदाराला त्रास होत असल्यामुळे तक्रारदार सतिश संतोष गोपाळ यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव व आपले सरकार या पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत सतिश गोपाळ यांनी म्हटले आहे की जिल्हापरिषद आरोग्य वर्धनी दवाखाना जवळपास एक कोटी रुपयांच्या निधीचे दवाखान्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु बांधकाम करतांना संबंधित ठेकेदार ठरवून दिल्या प्रमाणे काम करत नसून हिन दर्जाचे साहित्य व इतर मटेरियल वापरू बोगस व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करत असल्याची ओरड मी वारंवार करत आहे. या बद्दल मी संबंधितांकडे तक्रार केली असता संबंधित ठेकेदाराने मला एक वेळ पाचोरा येथे अडवून त्यांच्या माणसाकडून मारहाण केली होती. याबाबत मी पाचोरा पोलीस स्टेशनला तसेच नंतर कोल्हे येथे संबंधित ठेकेदाराने स्वतः मला धमकी दिली होती म्हणून मी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला माझ्या जीवितास धोका असल्याबाबतचा अर्ज दिलेला आहे.
तरीसुद्धा संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसून आजही या दवाखान्याचे बोगस बांधकाम सुरू आहे. तसेच संबंधित ठेकेदाराकडून हस्ते परहस्ते मला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून माझ्यावर ३५३ प्रमाणे खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मला जीवितास धोका असून मी दवाखान्याच्या भ्रष्ट निकृष्ट कामाबद्दल चौकशी व्हावी तसेच माझ्या जीवितास काही कमी-जास्त झाल्यास संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरावे असे नमूद केले असून कामाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत ठेकेदाराला पेमेंट देण्यात येऊ नये अशी मागणी केली असून संबंधित ठेकेदार हा श्रीमंत व त्याला राजकीय पाठिंबा असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे माझे मत व्यक्त केले आहे.