शेंदुर्णी येथील वाडी दरवाजा भागातील ६० वर्षे जुन्या पिंपळाच्या झाडाची कत्तल.शेकडो पक्षांचा मृत्यू तर हजारो बेघर.
किरण चौधरी.(शेंदुर्णी) ता.जामनेर
दिनांक~१६/०८/२०२२
एका बाजूला अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी जहाँ डाल-डाल पर् सोने की चिड़ियां करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. हे देशभक्तीपर गीत म्हणून आपल्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतांना तर दुसरीकडे याच शेकडो चिमणी पाखरांचा व पक्षांचा निवारा असलेले सतत ऑक्सिजन देणारे हिंदू संस्कृतीत पूजनीय असे महाकाय अंदाजे पन्नास ते साठ वर्षे जुने असे पिंपळाचे झाड वाडी दरवाजा भागातील काही रहिवाश्यांनी केलेल्या तक्रारीवरून वनविभागाची रितसर कोणतीही परवानगी न घेता कापून टाकत भुईसपाट केल्यामुळे पर्यावरणाची हाती तर झालीच आहे मात्र वर्षानुवर्षे झाडावर वास्तव्यास असलेल्या शेकडो नव्हे तर हजारो पक्षाचा निवारा नष्ट झाला असून शेकडो पक्षांच्या लहान, लहान पिलांचा मृत्यू झाला असून काही जिवंत मोठ्या प्रमाणात मृत झालेल्या पक्षांच्या पिलांना निर्दयपणे खड्यात व नदीच्या पात्रात फेकुन दिल्याने सुज्ञ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
याबाबत जनमानसातून व निसर्गप्रेमींनी कडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी नगरीतील वाडी दरवाजा भागात पन्नास ते साठ वर्षापूर्वीचे जुने महाकाय पिंपळाचे झाड होते. या झाडावर हजारो पक्षांनी आपले बस्तान बसवले होते व निवारा शोधला होता. याच झाडावर वर्षानुवर्षापासून राहणाऱ्या पक्ष्यांची आपली घरटी तयार करून त्यात अंडी देणे, अंडी उबवणे ही साखळी सुरु होती. झाडावर पक्षी रहात असल्याने दररोज सकाळी व संध्याकाळी विविध जातींच्या म्हणजे सगळे, चिमण्या, कावळे, बदक व ईतर पक्षांचा किलबिलाट सुरु असायचा याच सकाळच्या आनंदायी किलबिलाटातून सकाळी, सकाळी आसपासच्या रहिवाशांना दिवस उगवल्याचा तर संध्याकाळी घराकडे परतण्याचा संदेश मिळायचा. मात्र सायंकाळी होणारा किलबिलाट व आवाज मात्र जास्त असायचा कारण सगळेच पक्षी एकाचवेळी झाडावर परतत नसल्याने प्रत्येक पक्षी आपल्या जोडीदाराला शोधण्यासाठी जोरजोराने टाहो फोडून जोडीदाराला बोलवत असायचा असा भास त्यांच्या ओरडण्याने समजून येत होता व अंधार होताच सगळं काही शांत, शांत. होत होतं.
परंतु पक्षाच्या दैनंदिन गरजा व नैसर्गिक शारीरिक अत्यावश्यक बाबींचा वाडी दरवाजा परिसरातील नागरिकांना थोड्याफार प्रमाणात त्रास होत होता ही बाब समोर येत आहे. यात हे झाडावर रहाणारे पक्षी आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी चोचीत आणलेले खाद्य कधी, कधी चोचीतून खाली पडून तसेच पक्ष्यांची पडणारी वीष्ठा यामुळे या भागात थोड्याफार प्रमाणात दुर्गंधी येते अशी तक्रार होती. तर काही रहिवाशांना या चिमणी, पाखरांच्या किलबिलाटामुळे सकाळी झोपमोड होत होती अशीही तक्रार केली होती असे खात्रीलायक वृत्त जनमानसातून समोर येत आहे.
एका बाजूला या त्रासाला कंटाळून काही रहिवाशांनी वृक्षतोड करण्यासाठी शेंदुर्णी नगरपंचायतीकडे मागणी केली होती तर दुसरीकडे याच परिसरातील नागरिकांना आपल्या रडणाऱ्या लहान, लहान बाल, गोपाळांना समजवण्यासाठी घरातील आई व आजीबाई चु, चु ते चारा खात पाणी पी आणि भुर्रकन उडून जा असे म्हणत त्या बाळाला हसविण्याचा प्रयत्न करत असे. कधी झाडावर कावळा ओरडलाच तर आज आपल्याकडे पाहूणे येणार कि काय असा अंदाज सहज असायचा विशेष म्हणजे आपल्या घरातील स्वर्गीय बाप, दादे, वाडवडीलांसाठी पितृपक्षात घराच्या छतावर जाऊन मिष्ठान्न भोजन ठेवून कावळ्यांची वाट पहाणारी निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी मंडळीही याच परिसरात रहात असून यांनी नगरपंचायतीने महाकाय पन्नास ते साठ वर्षापूर्वीचे पिंपळाचे झाड कापून टाकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
वृक्षलागवड व संवर्धनाची गरज.
आजच्या परिस्थितीत लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सगळीकडे शेत जमीनीचे बिगरशेतीत रुपांतर करुन त्याठिकाणी कारखाने, घरे, सिमेंट काँक्रीटचे रस्ते मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत. तसेच राखीव जंगलासह इतर सार्वजनिक मालकीचे हिरव्यागार भुखंड कायदा धाब्यावर बसवून ताब्यात घेत त्याठिकाणी प्रगतीच्या नावाखाली वनराई नष्ट करण्यात येत आहे. सगळीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असल्याने पक्षांचा निवारा हिरावून घेतला जात आहे. सगळीकडे भ्रमणध्वनीचा वापर होत असल्याने आता पुन्हा फास्ट नेटवर्कर चालविण्यासाठी फाईव्ह जी ची घोषणा शासनाने केली आहे. या रेडिएशन मुळे पक्षी मरतात कशी चर्चा ऐकायला येत आहे. वृक्षतोडीमुळे हवेतील आर्द्रता, गारवा, ऑक्सिजनचे प्रमाणात कमालीची घट झाली आहे. वातावरणावरील ओझोन वायूचा स्तर कमी होत असल्याने वाढती उष्णता, कधी उन्हाळ, कधी पावसाळा तर पावसाळ्यात दुष्काळ व उन्हाळ्यात बेमोसमी पाऊस हे सगळे वनराई नष्ट झाल्याचे दुष्परिणाम आहेत म्हणून आतातरी वृक्षतोड थांबवून निर्सगाचे संगोपनासाठी एकत्र येऊन निसर्ग वाचवला, जिवलगा तरच ठिक नाहीतर विनाश काळ अटळ आहे हे मात्र निश्चित.
संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपण हा पुर्ण अभंग प्रथम बघु या, कारण अभंगात परस्पर ओव्याचा संबंध असतो.
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत।।
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ।।
कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ।।
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी।।
हा अभंग तुकाराम महाराजांनी वृक्ष वल्ली यांच्या पासून आपल्याला खुप फायदे आहेत, म्हणून तेच आपले सगे सोयरे आहेत ही महाराजांची धारणा आहे. वनातील पशु – पक्षी हे सुध्दा पांडुरंग विठ्ठलाचे नाम स्मरण करीत आहे, असे अभंगातुन सांगत आहे. आपले या वनाशी खर तर नातंच आहे.
या वणांचे आवरण / मंडप म्हणजे आकाश आहे तर ही धरा एक प्रकारचे अंथरुण आहे. कोणी या आणि एकांत वास, सावली, वाऱ्याची झुळूक, पानांची सळसळ याचा मनसोक्त आनंद लुटा.
याच वृक्ष वल्लींच्या सानिध्यात ऋषी – मुनी आपले आसन व कमंडलु घेऊन राहिले व याच एकांत वासात त्यांनी कथा रुपी कमंडलु ओतपात भरले.
जर तुम्ही कोण आहात, काय करत आहात, याचा जरी ओळख करून घ्यायची असेल, या वनांच्या सानिध्यात येऊन भजन कीर्तन करा, तेव्हा तुम्हाला तुमचा जन्म कशासाठी आहे याची उकल होईल.
मनाचा मनाशी संवाद साधायचा असेल तर हीच एकांत व योग्य जागा आहे.
आता जरा खाली या वणांची उत्तपत्ती व तुकाराम महाराजांचा अभंग का निगडित आहे , ते बघु ;
वृक्षवनस्पतींशी साम्य असणारी वने निर्माण झाली. स्थळ व काळ यांनुसार या वनांच्या स्वरूपातही पुढे काही प्रमाणात बदल घडून आजच्या स्वरूपातील वने अस्तित्वात आली. वनांच्या जडण−घडणीच्या स्वरूपावर मानवी हस्तक्षेपाचा प्रथमपासूनच सतत परिणाम घडत गेलेला आहे. आदी मानवाच्या शिकारी जीवन पद्धतीत सर्वप्रथम वनांचा उपयोग पशू व पक्षी यांच्या शिकारीखेरीज, लाकडापासून अग्नी व ऊब, झाडांच्या सालीपासून वल्कले, कंदमुळे, शिकारीसाठी ओबडधोबड शस्त्रे निर्माण करणे अशा स्वरूपाचा झालेला असावा. त्यानंतरच्या शेतीप्रधान जीवन पद्धतीत वनक्षेत्र साफ करून धान्यांची लागवड करणे व शेतीच्या अवजारांसाठी लाकडे तोडणे असा वाढत्या प्रमाणात वनांचा वापर मनुष्य करू लागला. पुढे हळूहळू जसजसे वनांचे इतर अनेकविध उपयोग मानवाच्या लक्षात येऊ लागले, तसतसे वनांवरील मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण जास्त व्यापक व प्रकर्षी बनत गेले. फळे, सुगंधी व औषधी वनस्पती जमविणे, घरे, गुरांचे गोठे, होड्या, अवजारे, इंधन वगैरेंसाठी, तसेच शेतीचा विस्तार वाढविण्यासाठी निरनिराळ्या झाडंची लाकडे तोडणे अशा तऱ्हेचे हे हस्तक्षेप होते. सुरुवातीला मानवी वस्ती कमी व वने विस्तृत अशा परिस्थितीमुळे या हस्तक्षेपाचे वनांवर विशेष प्रतिकूल परिणाम होत नसत. त्यामुळे सहसा त्या काळी वनांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होत नसावा.
वनांचे, वृक्ष, वेली, पशु पक्षी सगे सोयरे का तर वरील प्रकारे विविध उपयोग मनुष्याने वनांकडूनच करून घेतला आहे.